मराठवाडा गेल्या दोन महिन्यांपासून तहानलेला आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, संपूर्ण मराठवाडा आठवडाभरात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न केल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मराठवाडय़ात फिरू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिला.
लातूर ग्रामीण भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. गंजगोलाई येथून दुपारी १२ वाजता टाळ, मृदुंग, हलगी, ढोलच्या गजरात मोर्चा निघाला. मोर्चात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा देखावा करण्यात आला होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. विनोद तावडे, रमेशअप्पा कराड, गणेश हाके, गोिवद केंद्रे, सूरजित ठाकूर, संभाजी पाटील निलंगेकर, नागनाथ निडवदे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, आ. सुधाकर भालेराव आदी मोर्चाच्या अग्रभागी होते. मुख्य रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर लांब मोर्चा असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुमारे दोन तास कोलमडली.
तावडे म्हणाले, राज्यातील सरकार आंधळे व बहिरे आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उदगीर येथे तर बोगस बियाण्यांची फॅक्टरीच सापडली. मराठवाडय़ात पाण्याचे भीषण संकट असताना मुख्यमंत्री दुष्काळ का जाहीर करत नाहीत, असा सवाल करून आठवडय़ाभरात दुष्काळ जाहीर न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मराठवाडय़ात फिरू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यातील शासन खोटय़ा जाहिराती करून जनतेची दिशाभूल करते आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. शासकीय अनुदान मिळाले नाही. काहीच न करता फसव्या जाहिराती केल्या जात असून आपण सत्तेत आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. ३ लाख कोटी ७० हजार रुपयांचे कर्ज सरकारवर असून महाराष्ट्र हे भिकारी राज्य झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेत राज्याचा २७वा क्रमांक लागतो आहे. सर्व आघाडय़ांवर सरकार अपयशी आहे. जनतेने आम्हाला सत्ता हाती दिल्यानंतर पुन्हा एकदा गौरवशाली महाराष्ट्र उभा करू, असे ते म्हणाले.
रमेश कराड यांनी राज्याला आघाडी सरकारचे ग्रहण लागले आहे ते ग्रहण सोडवा. तुमच्या प्रश्नासाठी आपण सतत सोबत राहू, असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल?
मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासंबंधी आघाडी सरकारने घाईगर्दीत निर्णय केल्यामुळे तो न्यायालयात टिकेल का, याबाबतीत आपल्याला शंका आहे. आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर निरनिराळय़ा समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना न्याय दिला जाईल व सर्वाचे आरक्षण टिकेल याची काळजी घेतली जाईल, असे तावडे म्हणाले.