हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग  : करोनाचा वाढता प्रादुर्भाव, टाळेबंदी, किनारपट्टीवर वाढलेले जलप्रदूषण, यांत्रिकी नौकांची वाढलेली संख्या याचा एकत्रित परिणाम कोकणातील मासेमारीवर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच रायगड जिल्ह्य़ात मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ात ३ हजार ४४४ यांत्रिकी तर १ हजार ४९९ बिगरयांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ५० ते ६० हजार मेट्रीक टन मत्स्य उत्पादन मिळते, मात्र यंदा

जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात १७ हजार मेट्रिक टन घट झाली आहे. जिल्ह्य़ात २०१६-१७ ला  ४१ हजार ५१४ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते. २०१७-१८ ला हे ५३ हजार ३३८ मेट्रीक टनपर्यंत वाढले होते. २०१८-१९ साली मत्स्य उत्पादन ५८ हजार ८४७ पर्यंत वाढले होते. मात्र २०१९-२० या वर्षांत ते घटून थेट ४१ हजार ७९७ वर आले आहे. अरबी समुदात आलेली तीन वादळे आणि करोनाचा प्रादुर्भाव यामुळे मत्स्य उत्पादनात २०१८-१९ च्या तुलनेत जवळपास १७ हजार मेट्रिक टनाची घट आली आहे. पापलेट, सुरमई, शिंगाडा, घोळ, शेवंड यांसारख्या माशांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

आधीच डिझेलचे वाढते दर, कुशल खलाशी आणि तांडेल यांची कमतरता, परप्रांतीय बोटींचे आक्रमण, पर्सियन नेट फिशिंग यांसारख्या समस्या मासेमारी व्यवसायाला भेडसावत होत्या. आता करोनामुळे व्यवसायाचे अर्थकारणच बिघडून गेले आहे. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

मत्स्य उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्य़ातील मच्छीमारांच्या प्रश्नांसदर्भात पुढील आठवडय़ात संबंधित खात्याचे मंत्री अस्लम शेख यांची भेट घेणार आहे. तेव्हा मच्छीमारांना कशा पद्धतीने दिलासा देता येऊ शकेल यावर चर्चा केली जाईल.

      – आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड.

***

ओखी, वायू, नंतर निसर्ग चक्रीवादळे त्यात करोनाची साथ यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकार मदत करते. त्याच धर्तीवर मच्छीमारांनाही मदत मिळायला हवी.

      – महेश मोहिते, जिल्हाध्यक्ष भाजप.

रायगड जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनाची आकडेवारी

वर्ष                             उत्पादन

२०१६-१७        ४१ हजार ५१४ मेट्रिक टन

२०१७-१८        ५३ हजार ३३८ मेट्रिक टन

२०१८-१९        ५८ हजार ८४७  मेट्रिक टन

२०१९-२०        ४१ हजार ७९७  मेट्रिक टन