News Flash

रायगड जिल्ह्य़ातील अपघातांच्या प्रमाणात घट

टाळेबंदीचा परिणाम; गेल्या वर्षभरात ५९९ दुर्घटनांची नोंद

रायगड जिल्ह्य़ातील अपघातांच्या प्रमाणात घट
(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरात अपघातांच्या प्रमाणाच मोठी घट झाली आहे. टाळेबंदी आणि त्यामुळे वाहतुकीवर घातलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्य़ात वर्षभरात ५९९ अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण २०१९ च्या तुलनेत ४० टक्क्य़ांनी कमी आहे.

रायगड जिल्ह्य़ातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे दृतगती महामार्ग असे तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. वाहनांची संख्या जास्त असल्याने महामार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी सरासरी एक हजार अपघातांची नोंद होते. यात सरासरी अडीचशे ते तीनशे प्रवाशांचा मृत्यू होतो, तर सातशे ते आठशे जण जखमी होत असतात. मात्र गेल्या वर्षभरात जिल्ह्य़ातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. २०२० मध्ये जिल्ह्य़ात ५९९ अपघातांची नोंद झाली असून यात २०४ जणांचा मृत्यू, तर ४०४ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. वाहतुकीवर निर्बंध आणले गेले. जवळपास तीन महिने कठोर निर्बंध लागू होते. यामुळे महामार्गावरची वाहतूक थंडावली होती. याचा परिणाम अपघातांच्या संख्येवर झाला. अपघातांचे प्रमाण या कालावधी मोठय़ा प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे.

२०२० मध्ये मुबंई-गोवा महामार्गावर २०३ अपघात झाले. यात ६८ जणांचा मृत्यू झाला. तर १८९ जण जखमी झाले. मुंबई-पुणे जुन्या महामार्ग ४३ अपघातांची नोंद झाली. यात १९ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १०३ अपघात नोंदविले गेले. यात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले. २०१९ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २२० अपघात झाले होते. त्यातुलनेत २०२० मध्ये १०३ अपघातांची नोंद झाली. २०१९ ला मुंबई-पुणे राष्ट्रीय जुन्या महामार्गावर ६५ अपघातांची नोंद झाली होती, त्यातुलनेत २०२० मध्ये ४३ अपघात नोंदविले गेले. मुंबई-गोवा महामार्गावर २०१९ ला ३१५ अपघात झाले होते. २०२० मध्ये २०३ अपघातांची नोंद झाली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. वर्षभरात हे काम पूर्ण झाले तर अपघातांचे प्रमाण आणखी कमी होईल, असा अंदाज रायगड पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.

कारणे..

* अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर द्रुतगती मार्गावर रांगेची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडय़ांचे टायर फुटणे यामुळेही अपघात होतात.

* या शिवाय मद्यप्राशन करून गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीनो ओव्हरटेकिंग करणे यामुळेही अपघात होत आहेत.

* मुंबई-गोवा महामार्गावर संथगतीने सुरू असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. औद्योगिकीकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतूक हे देखील अपघातांचे प्रमुख कारण आहे.

आकडेवारी अशी..

* रायगड जिल्ह्य़ात २०१४ मध्ये १ हजार २६१ अपघांतांची नोंद झाली. यात ३२८ जणांचा मृत्यू झाला तर ७३० जण गंभीर जखमी झाले. २०१५ मध्ये अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले. १ हजार ४२३ अपघातात ३५७ जणांचा बळी गेला तर ८५५ गंभीररीत्या जायबंदी झाले. २०१६ मध्ये १ हजार १५१ अपघातात २५४ जणांचा मृत्यू झाला, तर ८७४ जण जखमी झाले.

* २०१७ मध्ये नोव्हेंबर अखेपर्यंत जिल्ह्य़ात १ हजार ०१० अपघात झाले. यात २५७ जणांचा मृत्यू झाला, तर ६६९ जण जखमी झाले. २०१८ मध्ये जिल्ह्य़ात १ हजार ९८ अपघात झाले. यात ३०२ जणांचा मृत्यू झाला. ७३२ जण जखमी झाले. २०१९ मध्ये जिल्ह्य़ात ९९१ अपघात झाले. यात २१६ जणांचा मृत्यू झाला, तर ६१३ जण जखमी झाले. २०२० मध्ये जिल्ह्य़ात ५९९ अपघातांची नोंद झाली. यात २०४ जणांचा मृत्यू झाला तर ४०४ जण जखमी झाले.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली, तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत जागृती केली. यामुळे गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. काही प्रमाणात टाळेबंदीमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

– रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रायगड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:16 am

Web Title: decrease in accident rate in raigad district abn 97
Next Stories
1 माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
2 जिल्ह्यासाठी ७१० कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर
3 करोनाकाळात पत्नीच्या कष्टांची नव्याने जाणीव-दामले
Just Now!
X