पाण्याची घट कमी प्रमाणात; चिंता नसल्याचे भूजल सर्वेक्षणातून स्पष्ट

पालघर : यंदाच्या हंगामामध्ये २४४४ मिलिमीटर (१०६ टक्के) पावसाची नोंद झाली असली तरीदेखील जिल्ह्यातील अधिकतर तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.  घट तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याने चिंता  नसल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे म्हणणे आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५५ विहिरींच्या पाण्याचे नियमित निरीक्षण करून पाण्याचा पातळीचा अभ्यास केला जातो. तसेच गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पातळीशी तुलना करून याबाबतचा अहवाल शासनाला ठरावीक कालांतराने पाठवण्यात येतो. या अहवालावर शासन टंचाईग्रस्त भागाचा पूर्वानुमान लावून आवश्यक ती उपाययोजना आखत असते.

पालघर तालुक्यात यंदा २७८६ मिलिमीटर (११४ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला असला तरी पाण्याची सरासरी पातळी एक सेंटिमीटरने घटली आहे. तालुक्यातील धुकटन, दुर्वेस व करवळे या ठिकाणच्या पाण्याच्या पातळीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे.

डहाणू तालुक्यात यंदा २२५२ मिलिमीटर (११८.५ टक्के) पावसाची नोंद झाली असली तरीसुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये ४० सेंटिमीटर घट झाली आहे. तालुक्यातील देऊर येथील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरीसुद्धा घोळ, कलमदेवी, सावटा व शिलोंदे येथील विहिरींची पातळी ऑक्टोबर महिन्यापर्यंत खालावल्याचे दिसून आले.

वसई तालुक्यात २७२१ मिलिमीटर (१००.७ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला. गोखिवरे व मांडवी येथील पाण्याची पातळी काही प्रमाणात उंचावली असली तरी आगाशी, बोळींज, खानिवडे, पेल्हार, सकवार व तिल्हेर येथील पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

तलासरी तालुक्यात १०६ टक्के पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील आठपैकी दोन विहिरींची पातळी खालावली आहे. वाडा तालुक्यात ८६ टक्के पावसाची नोंद झाली असताना सरासरी ३८ सेंटिमीटरने पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्याचबरोबरीने जव्हार येथे ८४ टक्के पाऊस झाला असताना ६८ सेंटिमीटर, तर मोखाडा येथे ८१ टक्के पाऊस नोंदवला असताना ६५ सेंटिमीटर पाण्याची पातळी खोली वाढल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र विक्रमगड येथे ९४ टक्के पाऊस नोंदविण्यात आला असताना तालुक्यातील दोन विहिरींमध्ये सरासरी १३ सेंटिमीटर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

काही तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, तर सरासरी गाठलेल्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी कालावधीत झाल्याने अधिक तर पाणी वाहून गेले. पाण्याच्या पातळीमध्ये झालेली घट कमी प्रमाणात असून सद्य:स्थितीत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.

– एम. एस. शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पालघर