आठ हजार कूपनलिकांवर परिणाम; दिवसाला ५० टँकर सदनिकांना पाणीपुरवठा

लोकसत्ता, हेमेंद्र पाटील

बोईसर: भूगर्भातली पाण्याची पातळी कमी झाल्याने बोईसरमधील सुमारे आठ हजार कूपनलिकांवर त्याचा परिणाम झाला आहे.  तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने अशा सदनिका टँकरने पाणीपुरवठा करताना दिसून येतात. बेसुमार मारलेल्या कूपनलिका व पावसाळी पाण्याचे नियोजन झाले नसल्याने या भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात बोईसरमध्ये पाण्याचा प्रश्न अधिकच चिंताजनक होत चालला आहे.

बोईसर परिसरात मोठे नागरी संकुलाचे बांधकाम सुरू असून पाण्याचे नियोजन नसताना देखील अशा इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. परिणामी बेसुमार मारण्यात येणाऱ्या कूपनलिका यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी देखील अधिक खोलवर गेली आहे. बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १५० कूपनलिका असून बोईसर हद्दीत साधारणपणे आठ हजार खाजगी कूपनलिका मारण्यात आल्या आहेत. २०० ते ३०० फूट खोलवर गेलेल्या कूपनलिका यामुळे येथील पाण्याची पातळी अधिक खोलवर गेली आहे. मे महिना शेवटच्या १५ दिवसांमध्ये या ठिकाणी कूपनलिकेचे पाणी येणे पूर्णपणे बंद होते. यासाठी येथील सदनिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. येथील काटकर पाडा, केशवनगर, कर्लर सिटी, साईबाबानगर, विजयनगर अशा अनेक भागातील सदनिकांना साधारणपणे ५०  टँकर पाणीपुरवठा होतो. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्या व नागरी वसाहती यामुळे पाण्याची मोठय़ा समस्या बोईसरसमोर उभी राहिली आहे. यातच बेसुमारपणे विकासक सदनिकांमध्ये खोलवर कूपनलिका मारत असल्याने अशा प्रकारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातले जात नाहीत. एकटय़ा बोईसर ग्रामपंचायतीमधील कूपनलिकांचा समोर आलेला आकडा येणाऱ्या काळात धोकादायक असल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. बोईसर भागात उभारण्यात आलेल्या नागरी संकुलांमध्ये पाण्याचे नियोजन केले जात नसून या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणे बंधनकारक असताना विकासक याकडे दुर्लक्ष करतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बोईसर भागातील वसाहतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने काही प्रमाणात नागरिकांची तहान भागवली जात आहे. यामुळे बोईसरसारख्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरासाठी योग्य पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कूपनलिकेला दूषित पाणी

तारापूर औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील पाम, कोलवडे, कुंभवली, सालवड भागातील कूपनलिकांचे पाणी दूषित झाल्याचे अनेकदा दिसुन आले आहे. या ठिकाणी असलेल्या कुंभवली, कोलवडे भागात तर कूपनलिकेला पिवळ्या रंगाचे पाणी येत असून कूपनलिकेचे पाणी आता रसायन मिश्रित झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात नैसर्गिक नाल्यात सोडले जाणारे घातक रसायन यामुळे या भागातील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने आजवर प्रदूषणाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.