25 November 2020

News Flash

औष्णिक वीज केंद्रांमधील उत्पादनात घट

क्षमतेच्या ५६ टक्केच निर्मिती; खर्चात चढउतार  

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांमधून क्षमतेच्या तुलनेत सरासरी ५६ टक्केच वीजनिर्मिती होत आहे. काही प्रकल्पांमधून वीजनिर्मिती करणे अधिक खर्चीक असल्याने त्या ठिकाणावरून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन केले जाते. खासगी प्रकल्प व केंद्रातून मिळणाऱ्या वाटय़ातून राज्यातील विजेची मागणी पूर्ण केली जात आहे. आगामी काळात राज्यातील विजेची मागणी वाढणार असल्याने कमी खर्चात वीजनिर्मिती करून ती पुरवण्याचे मोठे आव्हान महानिर्मितीपुढे राहणार आहे.

महानिर्मितीच्या वीजनिर्मितीच्या खर्चात सातत्याने बदल होतो. वीजनिर्मितीच्या खर्चावरून महानिर्मिती व खासगी प्रकल्पांमध्ये स्पर्धा असते. निर्मिती खर्च जास्त होत असल्यास महानिर्मितीचे प्रकल्प बंद ठेवण्यात येतात. कोळसा, पाणी, कोळशाचा वाहतूक खर्च, जुने प्रकल्प, मनुष्यबळ, देखभाल व दुरुस्ती आदी कारणांमुळे खर्चात वाढ होते. त्या तुलनेत खासगी प्रकल्पातून स्वस्त वीजनिर्मिती होत असल्याने त्या प्रकल्पातून वीज घेण्याचे करार ऊर्जा विभागाने केले आहेत. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित वीजनिर्मिती क्षमता एकूण ९७५० मेगावॅट आहे. त्यामध्ये कोराडी २४००, नाशिक ६३०, भुसावळ १२१०, पारस ५००, परळी ७५०, खापरखेडा १३४० चंद्रपूर येथील २९२० मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे. १६ ऑक्टोबरचे महानिर्मितीचे औष्णिक विद्युत केंद्रातील निव्वळ उत्पादन ५४८४ मेगावॅट आहे. त्यामधील ४०६ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या यंत्रणेलाच लागत असल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील ५०७८ मेगावॅट वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानिर्मितीच्या सर्व प्रकारचे प्रकल्प मिळून ६०४५ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. खासगी प्रकल्पातून ४५६८ मेगावॅट विजेसह मुंबई वगळता राज्याचे एकूण उत्पादन १०६१३ मेगावॅट आहे. मुंबईसह उत्पादन १२३११ वर जात असून राज्याची एकूण मागणी १६९१७ मेगावॅट आहे. केंद्रातील वीजनिर्मितीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ४६३१ मेगावॅट असून सध्या ४६०६ मेगावॅट वीज घेतली जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये विजेच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ होते. मागणी पूर्ण करण्यासाठी कमी खर्चात वीज उत्पादन करण्याची कसरत महानिर्मितीला करावी लागणार आहे.

इतर प्रकल्पांमधूनही उत्पादन कमीच

महानिर्मितीच्या गॅस प्रकल्पाची ६७२ मेगावॅटची क्षमता असताना २१६ मेगावॅटइतकेच उत्पादन होत आहे. हायड्रोच्या २५८० क्षमतेपैकी ३२९ मेगावॅट वीजनिर्मिती, तर सौरऊर्जा प्रकल्पातून १८० पैकी केवळ २७ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे.

औष्णिक प्रकल्पातील वीजनिर्मिती

(१६ ऑक्टोबर २०२० ची स्थिती)

नाशिक १३६

कोराडी  ७४०

खापरखेडा   ९०६

पारस   ३४८

परळी   ५९०

चंद्रपूर  १७५२

भुसावळ ६०६

एकूण   ५०७८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:18 am

Web Title: decrease in production in thermal power plants abn 97
Next Stories
1 अतिवृष्टीग्रस्त सोलापुरातील रडार यंत्रणा बंद
2 पेरलेले उगवतच नाही!
3 चार हजार कुटुंबांची उपजीविका अस्तंगत होण्याची भीती
Just Now!
X