हर्षद कशाळकर

करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी यामुळे रायगड जिल्ह्य़ातील अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे.

रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी एक हजार अपघातांची नोंद होते. सरासरी ३०० जणांचा मृत्यू होत असतो. यंदा मात्र यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्य़ात सप्टेंबर महिन्याच्या अखेपर्यंत ३९५ अपघातांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेपर्यंत जिल्ह्य़ात ७८१ अपघातांची नोंद झाली होती. म्हणजेच अपघातांचे प्रमाण जवळपास निम्म्यावर आले आहे.

मुंबई – गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – पुणे महामार्ग असे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्य़ातून जातात. यातील मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर अपघातात आजवर हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वाढलेली अवजड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालक ही या अपघातांमागची मूळ कारणे आहेत.

रायगड जिल्ह्य़ात २०१४ मध्ये १ हजार २६१ अपघातांची नोंद झाली. यात ३२८ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण गंभीर जखमी झाले. २०१५ मध्ये अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले. १ हजार ४२३ अपघातात ३५७ जणांचा बळी गेला, तर ८५५ गंभीररीत्या जायबंदी झाले. २०१६ मध्ये १ हजार १५१ अपघातात २५४ जणांचा मृत्यू झाला. तर ८७४ जण जखमी झाले. २०१७ मध्ये नोव्हेंबरअखेपर्यंत जिल्ह्य़ात १ हजार ०१० अपघात झाले. यात २५७ जणांचा मृत्यू झाला, तर ६६९ जण जखमी झाले. २०१८ मध्ये जिल्ह्य़ात १ हजार ९८ अपघात झाले. यात ३०२ जणांचा मृत्यू झाला. ७३२ जण जखमी झाले. २०१९ मध्ये जिल्ह्य़ात ९९१ अपघात झाले. यात २१६ जणांचा मृत्यू झाला, तर ६१३ जण जखमी झाले. २०२० मध्ये सप्टेंबरअखेपर्यंत जिल्ह्य़ात ३९५ अपघातांची नोंद झाली यात १३९ जणांचा मृत्यू झाला, तर २७९ जण जखमी झाले. यावरून या वर्षी अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यात देशभरात करोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीमुळे तीन महिने अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक जवळपास बंदच होती. नंतरचे तीन महिनेही वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध कायम होते.  यामुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली.

जिल्ह्य़ातील रस्ते अपघातांची आकडेवारी

वर्ष अपघात मृत्यू   गंभीर जखमी

२०१५   १४२३   ३५७    ८५५

२०१६   ११५१   २५४ ८७४

२०१७   १०१०   २५७ ६६९

२०१८   १०९८   ३०२ ७३२

२०१९   ९९१ २१६ ६१३

२०२०   ३९५ १३९ २७९

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली. या काळात वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर जवळपास १ लाख २३ हजार २७६ केसेस करण्यात आल्या. यातून ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे अपघातांचे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक निर्बंध असल्याने महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.

– सुरेश यमगर, जनसंपर्क अधिकारी, रायगड पोलीस