13 August 2020

News Flash

हवामान बदलामुळे परतीच्या पावसामध्ये घट

मान्सुनचा अभ्यास करताना सूर्यावरील घडामोडीचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर, लातूर

यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून पाऊस गायब झाला तो ऑक्टोबर अखेपर्यंत बरसलाच नाही. विशेषत मराठवाडय़ावर पावसाची खप्पामर्जी होती. परतीचा पाऊस चांगला होत असल्यामुळे रब्बीच्या पिकांसाठी या पावसाचा चांगला लाभ होतो. मात्र यावर्षी परतीचा मान्सुन  रुसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. यावर राज्यातील मान्सुन विषयाच्या अभ्यासकांनी हवामानात होणाऱ्या बदलाविषयी मते मांडली व यावर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी जपून वापरले पाहिजे व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवरच भर दिला पाहिजे असा सल्ला दिला आहे.

भारतीय हवामान विभागाचे उपमहानिदेशक कृष्णानंद होसाळीकर यांनी यावर्षीचा परतीचा मान्सुन न होण्याची कारणे सांगताना प्रामुख्याने अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले त्यामुळे मान्सुन वाऱ्याचा वेग बदलला आणि सौदी अरेबियाच्या दिशेने बदलल्याचे कारण सांगितले. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन काही भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला मात्र उर्वरीत भागात तो योग्य झाला नसल्याचे सांगितले. यावर्षी रायपूर, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या दिशेने परतीच्या मान्सुनचा प्रवास झाला. काही प्रमाणात आंध्र प्रदेशातील काही भागात पाऊस झाला. दरवर्षी विदर्भ मराठवाडा या भागात जो पाऊस होतो तो मान्सुनने दिशा बदलल्यामुळे झाला नाही. सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस मराठवाडा व विदर्भात झाला. तुलनेने कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस बरा झाला. सध्या चक्रीवादळ चेन्नईच्या दिशेने आहे त्यामुळे वार्याची दिशाही केरळच्या किनारपट्टीवरून वाहते त्यामुळे या महिन्यात हाणारा पाऊस केरळ व चेन्नई परिसरात होईल. आपल्या भागात पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

पुणे येथील भौतिकशात्रज्ञ व मान्सुनचे अभ्यासक किरण जोहरे म्हणाले, मान्सुनचा संबंध  सूर्याच्या उष्णतेशी निगडीत आहे. सूर्याकडून येणारी ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच बदल घडवून आणत नसून ती विद्युत चुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त तितके सौर वादळे जास्त. परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असते. मान्सुनचा अभ्यास करताना सूर्यावरील घडामोडीचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. सध्या सूर्याचे चोवीसावे आवर्तन सुरू असून २०१८ वर्षांप्रमाणेच २०१९ व २० ही पुढील दोन्ही वर्षे चोवीसाव्या क्रमांकाच्या आवर्तनात येतात. पुढील दोन्ही वर्षे किमान सौरडागांच्या वादळाचे वर्ष राहतील. बेल्जियमच्या सोलार इफ्ल्युअन्सेस डाटा एॅनालिसीस सेंटर सेंटर या संस्थेच्या माहितीचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यातून कमी सौरवादळाचे धुमारे निघाल्याची माहिती मिळते आहे. आगामी काळात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम मान्सुनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौरवादळांचा विचार केला तर भारतीय नऋत्य मान्सुन हा कमजोर होण्याची दाट शक्यता आहे. भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यात फरक झाल्याने मान्सुन उशिरा व कमजोर होऊ शकतो. त्यातून मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. डिसेंबर, जानेवारीतील उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील फरक फेब्रुवारी, मार्चमधील विषुववृत्तीय दक्षिण हिंदी महासागरच्या पृष्टभागावरील तापमान पूर्व आशियातील समुद्रसपाटीवरील दाब, जानेवारीचे वायव्य युरोपचे जमिनीलगतचे तापमान आणि फेब्रुवारी, मार्चमधील विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचे तापमान या पाच घटकांचा वापर करीत भारतीय मान्सुनचा अंदाज दिला जातो. सूर्य पृथ्वीपासून अतिदूर असल्याने मान्सुन व सूर्यावरील घडामोडींचा  संबंध नाही अशा ठाम वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही संस्था संशोधन करतात त्यामुळे सौरवादळ आणि मान्सुन यांचा संबंध नाकारत पाऊस चांगला होणार यावर हवामान खाते आपले म्हणणे मांडते. वस्तुत सौरवादळ व मान्सुन यांचा थेट संबंध आहे.

मान्सुन कमी होणार असला तरी त्यामुळे घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पध्दतीने कसा करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आगामी काळ चिंताजनक असून उपलब्ध पाणी दोन वर्षे कसे पुरवता येईल या पध्दतीने त्याचा विचार करण्याची गरजही जोहरे यांनी व्यक्त केली.

सर्व घटक विरोधात

पुणे येथील हवामान शात्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, यावर्षी जुलै महिन्यापासून ढगाळ हवामान राहिले. सूर्याचा प्रकाश कमी राहिला त्यामुळे तापमान कमी मिळाले. वाऱ्याचा वेग कमी झाला. हवेचा दाब अधिक झाला शिवाय चक्रीवादळ आले. पावसाच्या अनुकूलतेतील सर्व घटक विरोधात गेल्यामुळे पाऊस कमी झाला. हवेचा दाब कसा आहे ? यावर वारे आपली दिशा ठरवते. हवेचा दाब अधिक असेल तर ज्याप्रमाणे वाहतूक पोलीस वाहतुकीची गर्दी लक्षात घेऊन वेगळय़ा रस्त्यावरून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहने वळवतो त्या पध्दतीने वाऱ्याची दिशा बदलली जाते व त्या दिशेने मान्सुनचा प्रवास होतो. हवामानात बदल अतिशय वेगाने होत आहेत. प्रत्येक घटकाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करून अंदाज व्यक्त केला गेला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पावसाचा अंदाज सांगणे अतिशय अवघड होत असून पावसाळय़ात पाऊस नाही. थंडीच्या वेळी पाऊस तर उन्हाळय़ात गारपीट असे चित्र निर्माण होत आहे. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची मनस्थिती सर्वानाच  तयार करावी लागणार आहे. यावर्षी २१, २२, २३ नोव्हेंबर असे तीन दिवस मराठवाडा व विदर्भात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2018 1:00 am

Web Title: decrease in seasonal rain return due to climate change
Next Stories
1 चंद्रपूरमध्ये वाघांच्या तीन बछड्यांना रेल्वेने चिरडले; अवनी वाघिणीचे बछडेही दिसले
2 अत्याचारपीडितेच्या पुनर्वसनाची अशीही चित्तरकथा!
3 पिंपरीत-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त
Just Now!
X