रत्नागिरी जिल्ह्यात दररोज सापडणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय घट झाली असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३९ सकारात्मक रुग्ण सापडले  आहेत.

गेले सुमारे ८ दिवस जिल्ह्यात दररोज ९० ते १०० करोनाबाधित रूग्ण सापडत होते. हे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी झाले. मात्र ते किती दिवस टिकणार, यावर रोगाच्या नियंत्रणाबाबत मत व्यक्त करणे योग्य ठरेल, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

याचबरोबर आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, याच कालावधीत ८८ जणांनी करोनावर मात केली असून जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या १ हजार ९५३ झाली आहे. तसेच संशयित रूग्णांपैकी एकाही चाचणीचा अहवाल प्रलंबित राहिलेला नाही.

बुधवारी सापडलेल्या रूग्णांपैकी ३१ जण रत्नगिरी तालुक्यातील असून त्यापैकी २२ जणांची फक्त  अ‍ॅन्टीजेन चाचणी झाली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, बुधवारी एका ५० वर्षीय करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने या आजाराने मृतांची एकूण संख्या १०८ झाली आहे. तसेच एका व्यापाऱ्याची प्रकृतीही खालवल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापुरला हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवालही सकारात्मक आला आहे.