रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण सोमवारी घटले असून दिवसभरात फक्त १५ नवीन रुग्णांची भर पडली असून तेही सर्व गरबा कंपनीचे कर्मचारी आहेत.

याचबरोबर, दिवसभरात २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या काही दिवसांत दाखल रूग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या  प्रथमच जास्त आहे.

रविवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात  करोनाचे ३७ बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातही खेड तालुक्यातील खासगी कंपनीत करोनाचे जास्त रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा सतत वाढता राहिला. गेल्या चार—पाच दिवसांमध्ये बाधित रुग्णांचा आकडा जास्त होता; मात्र सोमवारी त्या तुलनेत दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. सोमवारी दिवसभरात फक्त १५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि ते सर्व घरडा कंपनीमधील आहेत. त्यामुळे या कंपनीच्या करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या १३२ झाली आहे.

रविवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील पाच रुग्णांपैकी दोघेजण राजीवडा, एक गुडेवठार आणि एक गावडेआंबेरे येथील आहे, तर कोतवडे येथे सापडलेली महिला रुग्ण रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. या सर्वाना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार २६२ असून उपचारांनी बरे झालेल्यांची एकूण संख्या ७४९ आहे. अशा प्रकारे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांमध्ये मिळून ४७२ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे रत्नागिरी शहर आणि परिसरातील फणसोप सडा परिसर, मिरकरवाडा, पोलीस वसाहत, वाटद-खंडाळा, आशीर्वाद अपार्टमेंट, माळनाका, नरहर वसाहत, नाचणे, नर्सिंग हॉस्टेल, मयुरेश्वर कॉम्प्लेक्स नाचणे,  जुवे, जयगड, कुणबीवाडी कसोप, भगवतीनगर भूतेवाडी, शेटयेवाडी शिरगाव, सनराईझ रसिडेन्सी मजगाव रोड  ही ‘करोना विषाणू बाधित क्षेत्रे’ म्हणून घोषित केली आहेत.