रायगड जिल्ह्य़ात गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. बेदरकार आणि तळीराम वाहनचालकांवर सातत्याने केलेली कारवाई, महामार्गावर वाढवलेला पोलीस बंदोबस्त आणि वाहनचालकांमध्ये केलेली जनजागृती यामुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.

मुंबई -गोवा महामार्ग, मुंबई -पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई- पुणे महामार्ग असे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्य़ातून जातात. यातील मुंबई- गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो.

या महामार्गावर अपघातात आजवर हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभिररीत्या जखमी झाले आहेत. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वाढलेली अवजड वाहतूक, आणि बेदरकार वाहन चालक ही या अपघातांमगची मूळ कारणे आहेत.

ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रायगड पोलिसांनी व्यापक प्रयत्न  सुरु केले. रस्ते वाहतुक नियंत्रणासाठी स्वतंत्र शाखा निर्माण केली.

त्यातील १०० कर्मचाऱ्यांना वाहतुक नियमन आणि नियंत्रणासाठी खास प्रशिक्षण दिले गेले. महामार्गावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बेदरकार वाहनचालकांवर कारवाई सुरु झाली. वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

वाहनचालकांना सुरक्षित प्रवासासाठी वाहतुक नियम पाळण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्य़ातील रस्ते अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले आहे.

रायगड जिल्ह्य़ात २०१२ मध्ये १ हजार ३९४ अपघात झाले. यात ३४२ जणांचा मृत्यू झाला. तर ८५४ जण गंभीर जखमी झाले. २०१३ मध्ये १ हजार २७९ अपघात झाले. यात ३२१ जण दगावले, तर ७६२ गंभीररीत्या जायबंदी झाले. २०१४ मध्ये जिल्ह्य़ात १ हजार २६१ अपघांतांची नोंद झाली. यात ३२८ जणांचा मृत्यू झाला तर ७३० जण गंभीर जखमी झाले. २०१५ मधअये अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले. १ हजार ४२३ अपघातात ३५७ जणांचा बळी गेला तर ८५५ गंभीररीत्या जायबंदी झाले. २०१६ मध्ये १ हजार १५१ अपघातात २५४ जणांचा मृत्यू झाला. तर ८७४ जण जखमी झाले. २०१७ मध्ये नोव्हेंबर अखेर पर्यंत जिल्ह्य़ात ९०४ अपघात झाले. यात २३० जणांचा मृत्यू झाला, तर ६०० जण जखमी झाले.

जिल्ह्य़ातील अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातात दगावणऱ्या आणि जखमी होणाऱ्यांची संख्याही घटण्यास सुरूवात झाली आहे. ही एक सकारात्मक बाब आहे.

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता सुरु झाले आहे. वर्षभरात हे काम पुर्णत्वाकडे गेले तर अपघातांचे प्रमाण आणखीन कमी होईल. असा अंदाज रायगड पोलीसांनकडून व्यक्त केला जात आहे.

‘ रस्ते अपघातांचे प्रमाणकमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सूर ठेवली. तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.’

–  मनोज म्हात्रे, पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा रायगड