News Flash

रुग्णसंख्या घटल्याने प्राणवायूच्या मागणीत घट

करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहराला दिलासा मिळत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.

विरार : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहराला दिलासा मिळत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. यामुळे प्राणवायूची मागणी काहीशी कमी झाली असून शहरातील रुग्णालयात खाटांची उपलब्धता वाढली आहे. सध्या प्राणवायूची १२ मेट्रिक टनने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शहराला केवळ १८ मेट्रिक टनची गरज भासत आहे. रुग्ण कमी झाल्याने लयातील खाटांची उपलब्धता १५ ते २० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती पालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

वसई-विरार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे काढले होते. त्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात रुग्णांची संख्या वाढून गंभीर होण्याचे प्रमाण वाढल्याने अचानक मोठय़ा प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढली होती. शहराला दररोज ३० मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागत होती. परंतु केवळ २५ मेट्रिक टन प्राणवायूची उपलब्धता होत होती. प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. प्राणवायू मिळवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर मोठय़ा झपाटय़ाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना उपचारासाठी रुग्णालयात प्राणवायू खाटा उपलब्ध होत नव्हत्या. ४३ खासगी रुग्णालये आणि पालिकेची दोन रुग्णालये असूनही अनेकांना वेळेवर खाटा उपलब्ध न झाल्याने आपल्या जीवाला मुकावे लागले होते.

पण मागील आठवडय़ापासून दुसऱ्या लाटेचा कहर कमी होताना दिसत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. त्याचबरोबर गंभीर रुग्णांचे प्रमाणसुद्धा कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मागील आठवडाभरात केवळ १ हजार ६८८ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३ हजार ७०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या ८ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत. कमी होत चाललेली रुग्णांची संख्या ही दिलासादायक बाब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:25 am

Web Title: decreased demand for oxygen due to declining patient numbers ssh 93
Next Stories
1 परदेशी नागरिक लसीकरणापासून वंचित
2 साताऱ्यात जम्बो रुग्णालयाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून ‘बाउन्सर’!
3 जिल्ह्याचे करोना संसर्गाचे प्रमाण पंधरा दिवसात ५१ वरून १६ टक्क्य़ांवर!
Just Now!
X