जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर मुख्यालय म्हणजेच सिंधुदुर्गनगरी शहराच्या निर्मितीस २५ वष्रे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करू या. सिंधुदुर्गनगरी पर्यावरणपूरक म्हणून या शहराच्या विकासाचा प्रयत्न करू या. यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नागरिक, पत्रकार, व्यापारी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बठकीत पालकमंत्री केसरकर बोलत होते. जिल्हा मुख्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबाबत शासनामार्फत २५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार, व्यापारी  यांच्याकडून विधायक सूचना याव्यात व याबाबत सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी ही बठक आयोजित केली होती. या वेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात उपस्थित होते.

सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वाराजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाची भव्य प्रतिकृती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व स्वागतकमान उभारण्याची सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, मुख्यालयातील सर्व प्रशासकीय इमारती, निवासी संकुल यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येईल. मुख्यालयातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती तसेच स्ट्रीट लाइट सर्व ठिकाणी लावण्यात येतील. दाभाची वाडी तलाव परिसरात पर्यटन स्थळ सुशोभीकरण या ठिकाणी गार्डन तसेच बोटिंग सुविधा सुरू करण्याबाबतचा पर्यटन महामंडळाने आराखडा तयार करावा, दहा टक्के विकसित भूखंड भूमिपुत्रांना वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाने तयार करावा, निवासी संकुलातील सांडपाणी पुनर्वापराबाबतचा प्रस्ताव तयार करावा, शासकीय आस्थापनांनी व निवासी संकुलातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आंबा, फणस, जांभूळ, जांभ आदी प्रकारच्या फळझाडांच्या वृक्षारोपणास पुढाकार घ्यावा, आदी  सूचना या वेळी पालकमंत्री केसरकर यांनी केल्या.

सिंधुदुर्गनगरी येथे नव्याने येणाऱ्या एन.सी.सी. बटालियनबाबत सविस्तर माहिती देऊन जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, जलतरण तलाव येत्या काही दिवसांत प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात येईल. मुख्यालय स्थापनेपासून येथील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेविषयी कोणताही अधिकृत कागद उपलब्ध नव्हता. तथापि आता प्राधिकरणामार्फत मालमत्ता मोजणी काम सुरू आहे.  नागरिकांनी मोजणीवेळी उपस्थित राहून आपल्या हद्दीप्रमाणे निस लावले याची खात्री करावी. नजीकच्या काळात मालमत्ताधारकांना सात-बारा वितरण केले जाणार आहेत.

या बठकीत उपस्थित नागरिक, पदाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जि. प. सदस्य अमरसेन सावंत म्हणाले की, डम्पिंग गार्डनची जागा बदलावी, पीटढवळ नदीवर बंधारा व्हावा, डिगस धरणातून पाणीपुरवठय़ाच्या पाइपलाइनची दुरुस्ती  व्हावी, स्मृतिवनाचे सुशोभीकरण व्हावे.  महेश पारकर म्हणाले की, गार्डन सिटीवर आधारित जिल्हा निर्मिती झाली. गुलमोहर झाडांची लागवड मोठय़ा प्रमाणात व्हावी, ड्रेनेज सुविधा व्हावी, भविष्यात सिंधुदुर्गनगरीची लोकवस्ती वाढणार हे गृहीत धरून गावडेवाडी धरणातील  पाणी योजना करावी. माजी सरपंच नागेश ओरोसकर म्हणाले की, निवासी संकुलातील सांडपाणी नाल्यात सोडले जाते त्यावर ट्रीटमेंट  होऊन पाणी सोडावे.  या वेळी सुनील जाधव म्हणाले की, ओरोस मुख्यालयासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी, ओरोस बाजारपेठेचे नूतनीकरण करावे, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व्हावी.  द्वारकानंद डिचोलकर म्हणाले की, दिशादर्शक फलक, रस्त्यावर लाईट सुविधा, प्रकाश जैतापकर प्राधिकरणाला २५ वष्रे पूर्ण झालीत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अनधिकृत बांधकामे हटवावीत, हॉकर झोन सुरू करावा, रस्त्यांची दुरुस्ती, उपाहारगृह सुविधा व्हावी, फिल्टरेशन प्लॉटचे नूतनीकरण व्हावे. बी. पी. चव्हाण म्हणाले की, महावितरणमार्फत ट्रान्सफॉर्मर बसविला जात नाही.  नारायण मांजरेकर म्हणाले की, दाभाची वाडी मुख्यालयास जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना अल्प मोबदला मिळाला आहे, त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत मिळावी. फळबाग झाडांच्या किमती निश्चित करून मोबदला देणे प्रलंबित आहे, त्यावर निर्णय द्यावा. कचरा डिम्पग ग्राऊंड दाभाची वाडीजवळ आहे तो बदलावा.

के. आर. सुतार म्हणाले की, व्यापारी मुख्यालयात व्यापाऱ्यांकरिता राखीव जागा नाही. व्यापार पेठेसाठी राखीव भूखंड मिळावा.श्री. घोगळे म्हणाले की, कॅटिरग कॉलेज व्हावे, महिला पॉलिटेक्निक व्हावे, शासकीय तांत्रिक विद्यालय व्हावे.

सकाळी पालकमंत्री केसरकर यांनी मुख्यालय परिसरात  फिरून विविध ठिकाणी भेटी दिल्या व परिसराची पाहणी केली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाहणीस प्रारंभ केला. ओरोस आठवडा बाजार मार्केट, सिडको भवन, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाची नियोजित जागा, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी  कर्मचारी निवासी संकुल, टाऊन गार्डन, जिल्हा कारागृह, स्मृतिवन, दाभाची वाडी पर्यटन स्थळ या ठिकाणी भेटी  देऊन परिसराची पाहणी केली. या वेळी आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जान्हवी सावंत, सरपंच मंगला ओरोसकर, ग्रामस्थ तसेच अधिकारी  उपस्थित होते.