अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास आता ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अटकेत असलेल्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या ताब्यातील वस्तू आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस पथकांनी सुरू केले आहे. शिवकु मार सध्या पोलीस कोठडीत असून  उद्या, पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. त्याला पुन्हा धारणीतील न्यायालयात हजर करण्यात येईल.

पोलीस पथकाने शिवकु मार याला रविवारी धारणी पोलीस ठाण्यातून हलवले आणि चौकशीसाठी चिखलदरा येथे नेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याच्या संपर्काची साधने आणि इतर माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्व पत्रात अनेक बाबींचा उल्लेख के ला आहे. त्यात शिवकु मार यांनी के लेल्या छळाविषयी लिहिले आहे. पोलिसांनी यासंदर्भातील पुरावे एकत्रित करण्यास प्राधान्य दिले आहे.

धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांनी या प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज त्यांच्या सुपूर्द केले आहेत. त्यामुळे या  तपासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्या नावे लिहून ठेवलेल्या चारपानी चिठ्ठीत दीपाली यांनी आपल्या आत्महत्येस उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्याकडून होणाऱ्या छळाबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. याप्रकरणी पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून २६ मार्चला त्याला नागपूर रेल्वेस्थानकावरून अटक केली.

धारणी येथील न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी सुरू असताना  या प्रकरणाचा तपास एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी घेतला. त्यानुसार या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण विभाग) पूनम पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला.

तपासासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांना तपासात मदत करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळेही त्यांना तपासात मदत करतील. त्यामुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासाला  गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.

राणा दाम्पत्याचा जबाब नोंदविण्याची मागणी

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी यांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेऊन उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याने चालवलेल्या छळाविषयी माहिती दिली होती. आमदार रवी राणा यांनी देखील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहून याविषयी त्यांना अवगत के ले होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवावा,  अशी मागणी  सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी के ली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन राणा दाम्पत्याचा जबाब नोंदविल्यास या प्रकरणाला बळकटी येईल, असे त्यांनी धारणीच्या पोलीस निरीक्षकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.