अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले.  याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेचीही मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत काही महिला वनकर्मचारी रेड्डी यांच्या समर्थनार्थ निवेदन घेऊन खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी गेल्या. त्यावेळी त्यांना खासदार राणा यांनी चांगलेच खडसावले.

रेड्डीसारख्या बदमाश माणसाचा बचाव करण्यासाठी तुम्ही आल्या आहात, निवेदनही आणले आहे. पण मी तुमचे हे निवेदन स्वीकारणार नाही. रेड्डी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दीपालीला आत्महत्या करावी लागली. त्यांना मी दहा वेळा फोन केले, आमदार रवी राणा यांनीसुद्धा संपर्क साधला आणि दीपाली यांना त्रस्त करणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारवर कारवाई करण्यासाठी वारंवार सांगितले. पण त्यांनी एकले नाही आणि दीपालीला जीव गमवावा लागला. तुम्हीसुद्धा महिला आहात, त्याच विभागात काम करीत आहात. हा अधिकारी आज आहे, उद्या दुसऱ्या जिल्ह्यात निघून जाईल. तुम्ही का म्हणून त्याला मदत मिळवून देण्यासाठी येथे आल्या आहात. एका महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी त्या अत्याचार करणाऱ्याच्या बाजूने उभे राहताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? असा सवाल नवनीत राणा यांनी निवेदन द्यायला आलेल्या महिला वनकर्मचाऱ्यांना के ला.

‘तुम्ही आज अशा वागत आहात, उद्या तुमच्यावर अशी परिस्थिती आली, तर आमच्यासारखे लोक तुमच्या मदतीला येणार नाही. एक महिला म्हणून तुम्ही का या निवेदनावर सा केल्या.

त्या शिवकुमारला तर शिक्षा होईलच, पण रेड्डी यांना शिक्षा व्हायला हवी, ही मागणी तुम्ही केली पाहिजे. कारवाईची मागणी तुम्ही करायला हवी,  तर तुम्ही हे भलतेच काय घेऊन आल्या. पालकमंत्र्यांनीही त्या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. तरीही रेड्डींनी शिवकुमारची चौकशी केली नाही. दीपाली रडून-पडून त्यांना वारंवार सांगत राहिल्या. पण रेड्डींना पाझर फुटला नाही. त्यामुळेच शेवटी दीपाली यांनी आत्महत्या केली. अशा महिलेबद्दल तुम्हाला काही वाटत नसेल, तर तुम्ही आपले निवेदन उचला आणि निघा येथून, असे महिलांना म्हणताना खासदार राणा यांचा संताप चांगलाच अनावर झाला होता.  संतप्त झालेल्या राणा यांनी कर्मचाऱ्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.