अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या एम. श्रीनिवास रेड्डी याची अखेर न्यायालयीन कोठडीत १ मे रोजी रवानगी करण्यात आली. वाढीव पोलीस कोठडी मागण्यासाठी सरकारी पक्षाचे वकील तसेच तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयापुढे अर्ज करण्यात न आल्यामुळे रेड्डी याला पुढील चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश धारणी न्यायालयाने दिले. धारणी पोलिसांच्या मार्गदर्शनात रेड्डी याला विशेष पथकाच्या देखरेखीत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात स्वाधीन करण्यात आले असून रेड्डी याला स्थानिक अंध विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून सर्वप्रथम तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार  याला नागपूर येथून अटक करण्यात आल्यानंतर याच गुन्ह्य़ात सहआरोपी म्हणून प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी याला देखील २८ एप्रिलच्या मध्यरात्री नागपूर येथून अटक करण्यात आली होती.

शनिवारी १ मे रोजी दुपारी सह आरोपी एम. श्रीनिवास रेड्डी याला दुपारी धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे  यांच्यापुढे हजर करण्यात आले. पोलिसांकडून युक्तिवाद करणारे सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत न्यायाधीश मुकुंद गाडे यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरत रेड्डीला पुढील चौदा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

२९ एप्रिलला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी पोलीस कोठडीत असलेल्या निलंबित आरोपी एम. श्रीनिवास रेड्डीची शुक्रवारी सायंकाळी धारणी येथे जाऊन घटनेसंदर्भात चौकशी केली. त्यादरम्यान तपास अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील, ठाणेदार विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.