हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी निलंबित क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश धारणी येथील न्यायालयाने दिले आहेत.

रेड्डी याला अमरावती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नागपुरातून बुधवारी उशिरा रात्री अटक के ली होती. गुरुवारी पहाटे त्याला धारणी पोलीस ठाण्यात आणले. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या विरोधात धारणी पोलीस ठाण्यात भादंवि ३१२,५०४, ५०६ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले होते. गुरुवारी  रेड्डी याला ३०६ या कलमान्वये अटक करण्यात आली. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी दिले.

विनोद  शिवकुमार देत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल दीपाली यांनी रेड्डीकडे दाद मागितली होती. पण रेड्डीने शिवकुमारला सुरक्षा कवच दिले म्हणून दीपालीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने रेड्डी याच्या विरोधात देखील आत्महत्येस प्रवृत्त के ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता रेड्डीला न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला रेड्डीची कोविड चाचणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पोलिसांनी तातडीने त्याला कोविड सेंटरला नेऊन दोन चाचण्या के ल्या. अँटिजन चाचणी नकारात्मक आली, तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दोन दिवसांनी प्राप्त होणार आहे. तपासणीनंतर त्याला पुन्हा न्यायालयात आणले गेले आणि सुनावणी सुरू झाली. धारणी पोलिसांनी आरोपीला सात दिवस पोलीस कोठडीची विनंती न्यायालयात के ली होती. बचाव पक्षातर्फे विधिज्ञ अ‍ॅड. मनीष जसवाणी, अ‍ॅड. व्ही. जी. चव्हाण, अ‍ॅड . दीपक वाधवाणी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता बी.एम. पटेल यांनी युक्तिवाद केला.

एम.एस. रेड्डी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी पहाटे ४.३० वाजता पथक धारणी येथे पोहोचले. रेड्डी याला पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. त्याला तेथेच अंथरूण-पांघरूण देण्यात आले. तपास अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कु ळकर्णी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सरवदे यांच्या चौकशीनंतर घडामोडींना वेग

दीपाली चव्हाण यांनी गेल्या २५ मार्च रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या गंभीर प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक झाली. रेड्डी याच्या विरोधात दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी फिर्याद दिली होती, त्यामध्ये रेड्डी सुद्धा दीपालीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रेड्डी याच्या भूमिके ची चौकशी करण्यासाठी नियुक्त आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांनी दोन दिवस संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर अचानक घडामोडी घडल्या व रेड्डीला तडकाफडकी अटक करण्यात आली.