भाजपाचे नेते अरुण जेटली यांच्या निधनाने भारताने एक उत्तम संसदपटू गमावला आहे. त्यांचं निधन हा देशासाठी मोठा आघात आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशाने एक उत्तम संसदपटू, एक उत्तम राजकारणी, अभ्यासू आणि धोरणी नेता गमावला आहे. जेटली यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. अरुण जेटली यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो असे म्हणत शरद पवार यांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केंद्रात अरुण जेटली यांनी अर्थमंत्रीपदासह, संरक्षण मंत्री आणि इतर विभागांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली
त्यातून ते उत्तम प्रशासक आहेत याची प्रचिती देशाला आली. क्रीडा क्षेत्रातही अरुण जेटली यांना विशेष रस होता. खेळाबद्दल त्यांना आस्था होती. कला, संगीत अशा विविध क्षेत्रात समरस होणारं त्यांचं व्यक्तीमत्व होतं. त्यांनी बारामतीत केलेला दौरा आणि इथल्या कामांची केलेली स्तुती लक्षात राहिल. एका सहकारी मित्राला गमवावं लागलं असं म्हणत शरद पवार यांनी अरुण जेटलींविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. ९ ऑगस्टपासून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काहीतरी किमया घडेल आणि जेटली यांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा भाजपातल्या सगळ्याच नेत्यांना होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह भाजपातल्या दिग्गज नेत्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. मात्र आज अखेर दुपारी १२ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास अरुण जेटली यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर भाजपातल्या दिग्गज नेत्यांनी आणि इतर पक्षातल्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे.