सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे अॅड.शरद बनसोडे यांनी एक लाख ५१ हजारांच्या मत फरकाने धक्कादायक पराभव केला. हा पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला असून यात त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. शिंदे यांचा पराभव करताना फार तर ५० हजारांपर्यंत मताधिक्य मिळेल, अशी भाजपची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मिळालेले मताधिक्य अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळे भाजप तथा महायुतीला सुखद धक्का बसल्याचे दिसून आले. मोदी लाटेतील या विजयाने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. सामान्य नागरिकात मात्र शिंदे यांच्या या धक्कादायक पराभवाचीच चर्चा होती.
शरद बनसोडे यांना पाच लाख १९ हजार २८२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुशीलकुमार शिंदे यांच्या पारडय़ात तीन लाख ६८ हजार ४० मते पडली. नवनिर्वाचित खासदार बनसोडे यांना शिंदे यांच्यापेक्षा एक लाख ५१ हजार २४२ मतांची आघाडी मिळाली. बसपाचे अॅड. संजीव सदाफुले यांना २० हजार तर आम आदमी पार्टीचे ललित बाबर यांना केवळ ९५०० मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत १६ उमेदवार उभे होते. यात शिंदे वगळता अन्य पराभूत उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने अॅड.शरद बनसोडे यांना उभे केले होते. मूळचे सोलापूरचे व हिंदी व मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात असलेले बनसोडे यांनीही प्रथमच राजकारणात पदार्पण केले होते. त्या वेळी दिग्गज नेते शिंदे यांच्याकडून बनसोडे यांना सुमारे एक लाखांच्या मत फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
या पार्श्र्वभूमीवर बनसोडे यांनीही राजकारणापासून चार हात दूर राहणे पसंत करीत सोलापूरशी संपर्कही कमी केला होता. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा बनसोडे यांना घोडय़ावर बसविले. यात त्यांना खरोखर ‘लॉटरी’ लागली. शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करणारे बनसोडे हे ‘हिरो’ ठरले. या निवडणुकीत ‘अभिनेत्या’ने एका अनुभवी ‘नेत्या’चा पराभव केला.
सकाळी रामवाडी शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रात मतमोजणीला अतिशय संथ गतीने सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. यात बनसोडे यांनी शिंदे यांच्यावर ३६४० मतांची आघाडी घेतली होती. नंतर झालेल्या प्रत्येक फेरीत बनसोडे यांची ही मतांची आघाडी कायम राहिली. या लढतीत शिंदे यांना एकाही विधानसभा मतदारसंघातून मतांची आघाडी घेता आली नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातूनही शिंदे यांची पीछेहाट होऊन त्याठिकाणी बनसोडे यांना १८ हजार ३६६ मतांची आघाडी मिळाल्याचे दिसून आले. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या दक्षिण सोलापुरातूनही बनसोडे यांना २७ हजार १२३मतांची आघाडी मिळाली, तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मोहोळमध्ये १५ हजार ४७३ मतांच्या पिछाडीमुळे शिंदे यांना निराशा पत्करावी लागली. पंढरपूर-मंगळवेढा येथेही बनसोडे यांनाच (२१ हजार ७९७) मताधिक्य मिळाले. तर भाजपचा प्रभाव असलेल्या अक्कलकोटमध्ये २६ हजार ३५७ आणि सोलापूर शहर उत्तरमध्ये तब्बल ४१ हजार ८३३ मतांची घसघशीत आघाडी भाजपला घेता आली.
या निवडणुकीत एका बाजूला मोदी लाट तर दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीअंतर्गत झालेला दगा फटका त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. म्हणजे शिंदे यांना ‘महायुती’ व ‘आघाडी’ अशा दोन्ही आघाडय़ांवर सामना करावा लागला.यात त्यांची घोर निराशा झाली. तर इकडे प्रचंड मतांची बेगमी मिळविल्यानंतर भाजप तथा महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण संचारले. दुपारी निवडणुकीचा कल स्पष्ट होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. एकमेकांना मिठाई वाटण्यात आली. तर, ग्रामीण भागातील वयोवृध्द कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच जोर बैेठका मारून बनसोडे यांचा विजयोत्सव साजरा केला. गुलाल उधळून आनंद साजरा करताना त्यात अल्पसंख्याक समाजाचेही कार्यकर्ते हिरवे निशाण डौलाने फडकावत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविताना दिसून आले. राजवाडे चौकातील शहर भाजपच्या  कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी नवनिर्वाचित खासदार शरद बनसोडे यांच्या विजयाचे फलक झळकावून आनंद सोहळ्यात सहभाग घेतला होता.