७० हून अधिक शाब्दिक चुका

पालघर : पालघर पंचायत समितीद्वारे विद्यार्थ्यांसाठी ‘टॅलेंट सर्च’ ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली असली तरी या परीक्षेसाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिका सदोष असल्याचे दिसून आले. या प्रश्नपत्रिकेत भाषेसंदर्भात असंख्य चुका होत्या. ७०हून अधिक शाब्दिक चुका आढळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांचे ‘टॅलेंट’ तपासण्याची गरज असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

पालघरच्या पंचायत समितीतर्फे २२ जानेवारी रोजी ‘टॅलेंट सर्च’ परीक्षा घेण्यात आली. तालुक्यातील पहिली ते आठवीच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत बालमानसशास्त्र आणि अध्यापन या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ७० हून अधिक शाब्दिक चुका आढळल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना हुशार बनवण्याच्या नादात या प्रश्नपत्रिका बनवणारे विद्वान स्वत: नापास झाल्याचे सपशेल चित्र या प्रश्नपत्रिकेत असलेल्या चुकांवरून दिसून येत आहे

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उतरता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गटशिक्षणाधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र खताळ यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. पालघर तालुक्यातील ४०७ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण २४ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्या परीक्षेमधून टॉपर येणारे गुणवत्ताधारक विद्यार्थी शोधून त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रोत्साहित केले जाईल, असे मत डॉ. खताळ त्यांनी व्यक्त केले होते. मात्र प्रत्यक्षात भावी शिक्षक, अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अक्षम्य चुका आढळल्या आहेत. यासंबंधात पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्याकडे माहिती मागितली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

चौकशीची मागणी

गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी पालघरच्या पंचायत समितीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून ही परीक्षा पार पाडली. मात्र या परीक्षेसाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या खर्चातून विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडले, अशी भावना व्यक्त होत असून याबाबत चौकशीची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.