नव्या तोफा लष्कराकडे सुपूर्द करताना संरक्षणमंत्र्यांची टीका

नाशिक : तोफांसह अन्य लष्करी सामग्रीच्या वाटाघाटी आधीच्या सरकार काळात पुढे सरकल्याच नाहीत. यामुळे लष्करासमोर साधन सामग्री आणि दारूगोळ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रखडलेल्या वाटाघाटी, चाचण्या पूर्णत्वास नेत भाजप सरकारने भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशांतर्गत निर्मितीवर भर देऊन या क्षेत्रात स्वावलंबित्व प्राप्त करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. यामुळे ३० वर्षांनंतर तोफखाना दलात प्रथमच ‘के ९ वज्र टी’ आणि हलक्या वजनाची ‘एम ७७७’ या तोफा समाविष्ट झाल्याचे त्यांनी सूचित केले. लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यात काँग्रेसचा नामोल्लेख टाळून तत्कालीन सरकारचा हलगर्जीपणा आणि भाजप सरकारचे यशस्वी प्रयत्न त्यांनी ठळकपणे मांडले.

तोफखाना दलाच्या देवळाली कॅम्प येथील प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी सितारामन यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत के ९ वज्र टी, हलक्या वजनाची एम ७७७ या अत्याधुनिक तोफा आणि युध्दभूमीत तोफांची ने-आण करणारे खास वाहन लष्कराकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सितारामन यांनी ३० वर्षांत जे होऊ शकले नाही, तो तोफांचा विषय भाजपने अवघ्या चार वर्षांत मार्गी लावल्याचे सांगितले. लष्करात आधुनिक सामग्री समाविष्ट करण्याची श्रृंखला पुढे कायम राखली जाईल. संरक्षण सामग्रीसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी केले जात आहे. दक्षिण कोरियन बनावटीच्या के ९ वज्र – टी या तोफांच्या खरेदीत १० तोफा परदेशातून घेऊन उर्वरित ९० तोफा देशातच बांधणी केल्या जातील तर अमेरिकन बनावटीच्या ‘एम ७७७’ या हलक्या वजनाच्या १४५ तोफा खरेदीत तोच निकष अवलंबिण्यात आला आहे. याद्वारे लष्करी कार्यवाहीची सज्जता वृध्दिंगत होणार असल्याचे सितारामन यांनी सांगितले.

लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे लष्करप्रमुख रावत यांनी कौतुक केले. पुढील वर्षी स्वदेशी बनावटीच्या आणखी दोन तोफा तसेच रायफल, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र आदी सामग्री लष्करात दाखल होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे युध्दशैलीत बदल होऊन लष्कराची प्रहारक क्षमता वाढेल. नव्याने दाखल झालेल्या तोफांसाठी रेजिमेंट तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तोफखान्याच्या काही रेजिमेंटकडे १०५ एमएम लाईट फिल्ड गन आहेत. या तोफा बदलून त्यांची जागा १५५ एमएमच्या नव्या तोफा घेतील, असेही रावत यांनी नमूद केले. या कार्यक्रमात नव्या तोफांबरोबर बोफोर्स, १०५ एमएम फिल्ड गन, मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आदींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

‘एचएएल-राफेल’बाबत मौन

सुखोईची बांधणी करणाऱ्या एचएएलकडील काम लवकरच संपुष्टात येत आहे. राफेल विमान खरेदीशी संबंधित एचएएलच्या उपस्थित झालेल्या प्रश्नावर सितारामन यांनी भाष्य करण्यास नकार दिला. भारताला गर्व वाटेल असा आजचा दिवस आहे. प्रदीर्घ काळानंतर नवीन तोफा लष्करात समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे आज एचएएलच्या विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.