महापौर सुरेखा कदम यांचा ठपका

शहराच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेला (फेज-२) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विलंब होत, ‘मजिप्रा’कडून योजनेच्या ठेकेदारावर दैनंदिन लक्ष दिले जात नाही, असा ठपका महापौर सुरेखा कदम यांनी ठेवला आहे. या योजनेच्या कामाला गती द्यावी व कालमर्यादेत ती पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली.

फेज-२ योजनेचा आढावा घेण्यासाठी महापौर कदम यांनी आज, शनिवारी मजिप्रा, ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक सुनीता मुदगल, गटनेते संजय शेंडगे, उपायुक्त प्रदीप पठारे, काका शेळके, पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, अभियंता रोहकले, मजिप्राचे बडे आदी उपस्थित होते.

शहर व उपनगरातील जलवाहिन्या व डीआय जल वाहिनी टाकण्याच्या कामांना गती द्यावी, वितरण व्यवस्थेतील २०० मिमी व्यासाचे डीआय पाईप ९ किमीचे काम पूर्ण करावे, महामार्ग खोदून काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे, ते तातडीने पूर्ण करावे. रोजी किमान ३ किमीची खोदाई होण्यासाठी अधिक टीम लावावी, जयमातादी नगर, यशवंत कॉलनी आदी ठिकाणी दीड किमीचे काम बाकी आहे, ते पूर्ण करावे. बोल्हेगाव, रेणुकानगर, बालाजीनगर येथे क्रॉसिंगचे काम बाकी आहे ते पूर्ण करावे, कामास विलंब होत असल्याने मजिप्राने अभियंता वाढवावेत, शिवाजीनगर, कवडेनगर, कमलेशनगर भागात वितरण व्यवस्था प्रस्तावित करण्यात आलेली नाही, त्याठिकाणी पुन्हा सर्वे करावा, असे पूर्वीच सांगण्यात आले होते, मात्र त्याचा अहवालही सादर करण्यात आलेला नाही. मुळानगर येथील जॅकवेलच्या कुपिंगचे काम बाकी आहे, ते तातडीने पूर्ण करावे, असे महापौरांनी सांगितले.

कल्याणरस्ता, नागापूर, बोल्हेगाव या ठिकाणी मोठय़ा टाक्या जोडण्याच्या जलवाहिनीचे काम बाकी आहे, ते येत्या आठ दिवसांत पूर्ण करावे, पाईपलाईन टाकल्यानंतरच तेथे रस्ता काँक्रिटीकरण केले जाणार असल्याचे पठारे यांनी सांगितले.