News Flash

चंद्रपुरात करोना बळीच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विलंब

वीस ते चोवीस तास वाट बघावी लागत असल्याने नातेवाईकांना मन:स्ताप

(संग्रहित छायाचित्र)

वीस ते चोवीस तास वाट बघावी लागत असल्याने नातेवाईकांना मन:स्ताप

चंद्रपूर : करोनाबाधिताचे जिल्हय़ात ११०२ मृत्यू झाले आहेत. मृत्यू शासकीय किंवा खासगी रुग्णालयातील असो वा सर्व ठिकाणचे मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात एकत्र करून, त्यानंतर एका शववाहिकेत दहा ते पंधरा मृतदेह कोंबून मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी नेले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत वीस ते चोवीस तासांचा अवधी जात असल्याने मृताचे कुटुंबीय, नातेवाईक यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

एखाद्या रुग्णाचा मृत्यू सकाळी आठ वाजता झाला, सकाळी अकरा वाजता झाला, दुपारी, सायंकाळी किंवा रात्री उशिरा झाला असेल तर त्या दिवशीचे सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवले जातात, तिथे केवळ सहा मृतदेह ठेवता येतील असे शीतगृह आहे. त्यामुळे इतर मृतदेह पीपीई किटमध्ये बांधून उघडय़ावर शवागारात ठेवतात. त्यानंतर रोज सकाळी अकरा वाजता शवागारातील कर्मचारी तिथे येतो. मृतदेह व्यवस्थित बांधून ठेवतो. त्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास दोन शववाहिकेत प्रत्येकी दहा ते बाराच्या संख्येत मृतदेह ठेवले जातात.

तिथून थेट पठाणपुरा मोक्षधाम किंवा मुस्लीम, ख्रिश्चन असेल तर दफनभूमीत नेले जातात. त्यानंतर एकाच वेळी अंत्यसंस्कार व दफनविधी करतात. या संपूर्ण प्रक्रियेत वीस ते चोवीस तासांचा कालावधी जात आहे. अशावेळी मृताच्या नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार होईपर्यंत उपाशी तापासी ताटकळत वाट बघावी लागते.  एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर शवागारात मृतदेह आणण्याऐवजी थेट मोक्षधाम येथे शववाहिकेत नेऊन अंत्यसंस्कार करावा, अशी मागणी केली आहे.

मृतदेह वेळीच मोक्षधाम येथे पाठवावा

करोना मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कार्यप्रणाली चुकीची व मृतदेहाची विटंबना करणारी आहे. एकाचा मृत्यू रात्री सात वाजता झाला. त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवागारात आणण्यात आला. रात्र झाल्यामुळे सकाळी लवकर मृतदेह मिळेल, पण तिथले कर्मचारीच बारा वाजता आले व एकाच वेळी एका गाडीत दहा-बारा मृतदेह भरण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारचे तीन वाजले तरी मोक्षधाम येथे शववाहिका पोहचली नाही. एकंदरीत दिवसभरातले मृतदेह जमा करून एकाच वेळी विल्हेवाट लावणे चुकीचे ठरत आहे. विशेषत: बाहेरगावच्या नातेवाईकांचे फार हाल होतात व त्यांची मानसिकता बिघडत आहे.

संजय वैद्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,चंद्रपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:53 am

Web Title: delay in cremation of corona victim s body at chandrapur zws 70
Next Stories
1 Coronavirus : रायगडमध्ये दिवसभरात ९०८ करोनाबाधित
2 महाराष्ट्रातून बंगालमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करोना चाचणी सक्तीची
3 हिंगोलीत रुग्णसंख्या घटली; मृत्यूचे प्रमाण कायम
Just Now!
X