कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : बँकांकडून अपेक्षित प्रमाणात कर्जवाटप होत नसल्याने अनेक जिल्हय़ांमध्ये यावर्षी पीक कर्जाच्या उद्दिष्टालाच कात्री लावण्याचा प्रकार घडला आहे. पश्चिम वऱ्हाडात बुलढाणा व वाशीम जिल्हय़ात उद्दिष्टात कपात करण्यात आली, तर अकोला जिल्हय़ात गेल्या वर्षी एवढेच उद्दिष्ट कायम ठेवण्यात आले. पीक कर्ज वाटपाची कूर्मगती या वर्षीही कायम आहे. विविध कागदपत्रांच्या नावावर शेतकऱ्यांची अडवणूक होते. या सर्व प्रकारामुळे शेतकरी पुन्हा एकदा सावकारी कर्जाच्या गर्तेत अडकण्याची चिन्हे आहेत.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीक कर्जवाटपाचे नियोजन करण्यात येते. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात येतात. मात्र, प्रत्येक जिल्हय़ात उद्दिष्टय़ाच्या ३०-३५ टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप होते. विविध कारण पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच गत दीड वर्षांपासून करोनाच्या संकटाचा फटका बसला. खरीप हंगामाच्या नियोजनासह पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात येते.

पीककर्ज उद्दिष्टात कपात

एकीकडे पीक कर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवतात, तर दुसरीकडे शेतकरी पात्र ठरत नसल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे कारण बँकांनी पुढे केले. पीक कर्ज वाटपावरून असा विरोधाभास निर्माण झाला. या वर्षी अनेक जिल्हय़ांमध्ये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टच कमी करण्यात आले. काही जिल्हय़ांमध्ये ३०-३५ टक्के, तर काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट घटवण्यात आले. या निर्णयाचा फटका अनेक पात्र शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कमी केलेल्या उद्दिष्टानुसार तरी १०० टक्के पीक कर्ज वाटप होईल का? यावर प्रश्नचिन्ह आहे.

या वर्षी १ एप्रिलपासून पीक कर्जाचे वाटप सुरू झाले. पश्चिम वऱ्हाडातील अकोला जिल्हय़ात एक लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी एक हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. जिल्हय़ात गेल्या वर्षी एवढेच उद्दिष्ट कायम ठेवण्यात आले. आतापर्यंत ६२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ५७१.३६ कोटींचे कर्ज वितरित झाले. कर्जवाटपासाठी शेतकऱ्यांच्या निश्चित केलेल्या संख्येच्या ४३.७७ टक्के शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. कर्जवाटप उद्दिष्ट रकमेच्या ५०.११ टक्के कर्ज वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अकोला जिल्हय़ात पीक कर्ज वाटपाची गती वाढल्याचे दिसून येते. बुलढाणा जिल्हय़ात गेल्या वर्षी तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी दोन हजार ४६० कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. या वर्षी त्यामध्ये मोठी घट करण्यात आली. एक लाख ४० हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. दोन लाख २२ हजार ८२८ शेतकऱ्यांची संख्या कमी करून एक हजार १६० कोटीने उद्दिष्ट घटविण्यात आले. गेल्या वर्षी दोन हजार ४६० कोटींचे उद्दिष्ट असतांना केवळ एक हजार २०० कोटीचे वितरण झाले होते. त्यामुळे या वर्षी एक हजार ३०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत २९ हजार शेतकऱ्यांना २९९ कोटींचे कर्ज देण्यात आले. वाटपासाठी ठरवल्यापैकी २०.७१ टक्के शेतकऱ्यांना उद्दिष्ट रक्कमेच्या २३ टक्के कर्ज वाटप झाले. वाशीम जिल्हय़ातसुद्धा पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाला कात्री लागली. गेल्या वर्षी पीक कर्जवाटपाचे एक हजार ६०० कोटींचे उद्दिष्ट होते. या वर्षी ते एक हजार ०२५ करण्यात आले. एक लाख चार हजार ७९१ शेतकऱ्यांची संख्या ठरविण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ५४९.८७ कोटी रुपयांचे कर्ज ६७ हजार ७४६ शेतकऱ्यांना देण्यात आले. वाशीम जिल्हय़ात पात्र शेतकरी संख्येच्या ६४.६५ टक्के, तर उद्दिष्ट रकमेच्या ५३.६५ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले. वाशीम जिल्हय़ातही यावर्षी वेगाने कर्जवाटप झाले. विविध जिल्हय़ातील पीक कर्जाच्या उद्दिष्ट कपातीमुळे अनेक पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रब्बी हंगामासाठी अल्प उद्दिष्ट

विविध जिल्हय़ांमध्ये खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामासाठी अतिशय अल्प उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. खरीप हंगामात पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असते. १ एप्रिल ते ३१ ऑगस्टपर्यंत खरीप हंगामातील कर्जवाटप होते. त्यानंतर १ सप्टेंबरपासून रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटप केले जाते. अकोला जिल्हय़ात रब्बी हंगामासाठी सात हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ६० कोटी, बुलढाणा जिल्हय़ात २५० कोटी व वाशीम जिल्हय़ात सात हजार ३०२ शेतकऱ्यांसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.

पीक कर्जासाठी कागदपत्रांच्या नावावर बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे कधीही उद्दिष्टपूर्ती होत नाही. शेतकरी पीक कर्जासाठी त्रस्त आहेत. विविध जिल्हय़ात उद्दिष्ट कमी करण्यात आल्याने पात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकेल. 

– डॉ.प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज, महाराष्ट्र.