पीककर्ज वाटपात दिरंगाई होत असल्याचा निषेध करीत ‘भूमीपुत्र संघर्ष वाहिनी’ने युनियन बँकेच्या शाखेला शुक्रवारी टाळे ठोकले.

पीककर्ज वाटपात चालढकल होत असल्याबद्दल आंदोलनाचा इशारा संघटनेने यापूर्वीच दिला होता. प्रशासनाने सवलती देऊनही तसेच पालकमंत्र्यांच्या सूचना असूनही बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात चालढकल करीत आहेत. टाळेबंदीत लागू कठोर नियमांमुळे शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. तर दुसरीकडे खरीप हंगाम उंबरठ्यावर आला असतानाही कर्ज न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वर्धा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे १ हजार २९ कोटी रूपयाचे उद्दीष्ट आहे. मात्र, आतापर्यत केवळ ३७ कोटी रूपयेच कर्जवाटप झाले. ही बाब बँकांच्या कार्यशैलीवर प्रश्नाचिन्ह उपस्थित करणारी असून त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे संघटनानेते अभिजीत फाळके यांनी स्पष्ट केले.

या काळात शेतकऱ्यांसोबत संघटना ठामपणे उभी आहे. अडचणीच्या काळात बँका पीककर्ज देत नसेल तर त्या उघड्या ठेवून फायदा काय? असा सवाल संघटनेने करीत आज युनियन बँकेच्या वर्धा शाखेला टाळे ठोकले. यावेळी कार्यकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यापुढे बँकांनी आपल्या कार्यशैलीत बदल न केल्यास एकही बँक चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी संघटनेचे योगेश घोगरे, प्रवीण काटकर यांनी दिला.