राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता नसल्याने गर्भवतीची हेळसांड

पालघर : दोन दशकांपासून रस्ता नसलेल्या पालघर तालुक्यातील दुर्वेस काटेला पाडा येथील एका गर्भवतीची मुदतपूर्व प्रसूती शेताच्या बांधावर झाली. या घटनेत नवजात अर्भकाचा काही तासांत मृत्यू ओढवला. रस्त्याअभावी चादरीच्या झोळीतून नेत असताना ही घटना शुक्रवारी घडली. ही घटना समजल्यानंतरही आरोग्य कर्मचारी शनिवापर्यंत या महिलेकडे पोहोचले नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

पालघर तालुक्यातील दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीत ५० कुटुंबाचे वास्तव्य असलेला काटेला पाडा आहे. हा पाडा अनेक सुविधांपासून वंचित आहे.

पाडय़ापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता नसल्याने येथील नागरिकांना शेतांच्या बांधावरून कच्च्या वाटेने जावे लागते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर असताना जोड रस्त्याअभावी पावसाळ्यादरम्यान येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास काटेला पाडय़ातील शुभांगी विनोद वळवी या सात महिन्यांच्या गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. रस्ता नसल्याने महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला चादरीच्या झोळीत घालून दुर्वेसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असतानाच प्रसूती वेदना वाढल्याने शेताच्या बांधावर त्या महिलेची प्रसूती झाली. या घटनेत बाळ दगावले.

मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळ दगवल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असले तरी या रस्त्याअभावी ही प्रसूती होऊन बाळ दगावले ही वस्तुस्थिती आहे. रस्ता योग्य असता तर वाहनाने या महिलेला वेळीच उपचारासाठी नेता आले असते. प्रसूती झाल्यानंतर महिला घरी गेली. मात्र ही घटना घडली असल्याचे समाजल्यानंतरही आरोग्य यंत्रणेचे कोणतेही कर्मचारी तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले नव्हते. येथील जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्यानंतर महिलेला मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून काटेला पाडा रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. पाहणी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती उप विभागीय अभियंता हेमंत भोईर यांनी दिली.

विंचू, सर्पदंश नित्याचेच

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून काटेला पाडय़ात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शिक्षणासाठी ग्रामस्थांना चिखल तुडवीत दुर्वेस किंवा मनोर गाठावे लागते. पावसाळ्यात शेताच्या बांधावरून चालताना विंचू आणि सर्पदंश झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या सत्तेतील निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांच्या अनास्थेमुळे रस्ता अनेक वर्षांपासून रखडला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा.

विष्णू कडव, सभापती समाजकल्याण जि. प. पालघर.