22 November 2017

News Flash

दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास केंद्राचा हिरवा कंदील

सुमारे २,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित

नवी दिल्ली | Updated: September 12, 2017 6:54 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली आहे. २४७ किलोमीटरचा हा प्रकल्प २०२१- २२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत होती. इंग्रजांच्या काळात हा मार्ग बांधला असून व्यस्त मार्गामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवता येत नव्हती.  तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली होती. गेल्या वर्षी रेल्वेने या कामाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी टेंडर मागवले होते. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी देण्यात आली. दौंड- मनमाड या २४७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण होणार असून या कामाासाठी सुमारे २,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे रोजगारालाही चालना मिळेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशातील उत्तर- दक्षिण भाग जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होत असल्याने प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीला फायदा होणार आहे. याशिवाय शिर्डी आणि शनि- शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे.  अहमदनगर हे लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख तळ असल्याने लष्करालाही याचा लाभ होणार आहे.

मुंबई- चेन्नई मार्गावर भिगवण- मोहोळ आणि होटगी- गुलबर्गा या मार्गाच्या दुहेरीकरणाचे कामही सुरु असून हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर दौंड- मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक वाढेल आणि भविष्यात अहमदनगरचे महत्त्व वाढेल असे रेल्वेचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

First Published on September 12, 2017 6:54 pm

Web Title: delhi cabinet approves doubling of daund manmad railway line expected to complete in 5 years