राजधानी दिल्लीतून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून पळविण्यात आलेल्या चौदा वर्षांच्या मुलास औरंगाबाद शहरातील सायबर सेलच्या पोलिसांनी रविवारी दुपारी शहरात ताब्यात घेतले. मुलगा सुखरूप मिळाल्याने त्याचे वडील व चुलते यांनी औरंगाबाद पोलिसांना धन्यवाद दिले.
उत्तरपूर्व दिल्लीच्या खजुरीखास पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या ९ जुलैस या मुलाचे अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुलाचा तेव्हापासून शोध गेतला जात होता. मात्र, दोन महिने होत आले तरी शोध लागत नसल्याने त्याचे वडील, चुलते व नातेवाईक सैरभैर झाले होते. या मुलाचा शोध घेण्याबाबत दिल्ली पोलिसांचे पथक व या मुलाचे वडील आणि चुलते येथे दाखल झाले होते. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना भेटून मुलाच्या अपहरणाची माहिती या पथकाने दिली व शोध घेण्याकामी मदत मागितली. त्यावरून पातारे व त्यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत माहिती मिळवली. सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी सलग दोन दिवस पाळत ठेवून शोध घेत होते. अखेर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या रोशनगेट परिसरात मकसूद कॉलनीतील चंपा चौक येथे हा मुलगा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तब्बल दोन महिन्यांनी अपहृत मुलगा सुखरूप ताब्यात मिळाल्याने या मुलाचे वडील व चुलते यांनी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. सायबर सेलचे निरीक्षक पातारे यांच्यासह सहायक निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक अरुण घोलप, हवालदार रफिक सय्यद, पोलीस नाईक धुडकू खरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन देशमुख, रवि खरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली.