बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा – अजित पवार
दिल्ली येथील बलात्काराच्या प्रकरणात देशभर आक्रोश सुरू असतानाच येथे आयोजित महिलांच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा बलात्काऱ्यांना तर नपुंसक बनवले गेले पाहिजे, असे परखड मत मांडले. महिला मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी बलात्काराच्या प्रकरणात फाशीचीच शिक्षा हवी, असा आग्रह धरला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले. नेहरू मैदानावर आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून ते गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यापर्यंत सर्वानीच बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत व्यक्त केले, पण अजित पवार यांनी सर्वाना कडी करत बलात्काऱ्यांना नपुंसक बनवले पाहिजे, असे वक्तव्य केले.
बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षेसह कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला कायदा करावा लागणार आहे, पण आपणही आता काही उपाययोजना केल्या पाहिजेत, छेड काढणाऱ्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच धडा शिकवावा, छेडछाडमुक्त गाव, शहर आणि राज्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे अजित पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमकपणे या विषयावर मत मांडताना सरकारचेही वाभाडे काढले. महिलांना खरोखरच सरकारने न्याय दिला आहे का, असा सवाल त्यांनी केला. पोलीस ठाणे हे महिलांना माहेरघर वाटले पाहिजे, पण, तशी परिस्थिती नाही. महिलांवर अन्याय झाला, तर स्वपक्षाचेही सरकार का असेना रस्त्यावर उतरू, बलात्काऱ्यांना फाशी दिली गेली, तर आनंदच होईल, असे त्या म्हणाल्या.
लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण कशाला हवे, असा सवाल करीत त्यांच्या संरक्षणासाठी दिले जाणारे पोलीस संरक्षण महिलांसाठी वापरावे, असा सल्ला त्यांनी आर. आर. पाटील यांना दिला. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही लोकप्रतिनिधींच्या पोलीस संरक्षणाचा आढावा घेतला जाईल, असे सांगताना महिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल, पोलीस यंत्रणेत फेरफार आण् िन्यायव्यवस्थेत गतिमानता आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
छगन भुजबळ यांनीही आपल्या खास शैलीत महिला पोलिसांच्या हाती दंडुके देण्याची सूचना केली. बलात्काऱ्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हवाली करून तो घरी चालत जाऊ नये, अशी त्याची अवस्था केली पाहिजे, लहानपणी झालेल्या बलात्कारावर म्हातारपणी निकाल हे थांबले पाहिजे, आपल्याकडे लोकशाही देखील अजीर्ण झाली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रफूल्ल पटेल यांनीही बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत मांडले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांची सर्वप्रथम बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा हवी, असे मत मांडले, माजी आमदार सुलभा खोडके यांनीही स्त्री संरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी केली. सर्व वक्त्यांनी या मुद्यावर आपले विचार मांडले. सर्वाचा सूर बलात्काऱ्यांना फाशी हवी हाच होता.