सर्जेपुरा येथील महानगरपालिकेच्या रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर कडक कारवाईची मागणी मनपातील सभागृह नेते आरीफ शेख व नगरसेविका जयश्री सोनवणे यांनी केली आहे. मनपा आयुक्तांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की या व्यापारी संकुलात ३३ गाळे व ४ सभागृह आहेत. त्यातील २३ गाळे व चारही सभागृह अधिकृत आहेत. मात्र संकुलाच्या मोकळय़ा जागेत बेकायदेशीररीत्या ६ गाळे बांधण्यात आले आहेत. यातील २३ अधिकृत गाळे व ४ सभागृहांचाही करारनामा तब्बल २३ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९९२ मध्येच संपुष्टात आला आहे. या सर्वाना मनपाने आत्तापर्यंत तीनदा नोटिसा देऊन त्यांची सुनावणीही घेतली आहे. मात्र यातील अनधिकृत गाळेधारकांनी मनपाची नोटीसच बेकायदेशीर ठरवली असून मनपाने घेतलेला कुठलाच आक्षेप त्यांना मान्य नाही. शिवाय त्यांनी मनपाच्या नोटिशीला अतिशय उद्धट पद्धतीने उत्तर देऊन मनपाची कारवाईच बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मनपाने त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
सध्या मनपाची आर्थिक स्थिती हलाखीची असून कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. विकासकामांची देणीही खोळंबली आहेत. सर्जेपुरा हा परिसर मध्यवर्ती असून येथे जागेचे भाव सुमारे साडेपाच हजार रुपये प्रतिस्क्वेअर फूट आहेत. मनपा मात्र या गाळेधारकांकडून भाडय़ापोटी केवळ १ हजार ते १८०० रुपये घेते. या सर्वच गाळेधारकांनी मनपाच्या करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केला आहे. दुकानापुढील जागेत त्यांनी वाढीव बांधकाम केले असून, इमारतीचा स्लॅब तोडून यात बदल करण्यात आले आहेत. मनपा एकीकडे शहरातील अन्य ठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई करत आहे, मात्र या संकुलातील अतिक्रमणांना अभय देण्यात आले आहे. मनपाचा करारनामा तीन वर्षांचाच होता. तो संपल्यापासूनच्या काळासाठी या गाळेधारकांकडून रेडीरेकनरप्रमाणे भाडे वसूल करावे. नगररचना विभागाने तसाच अभिप्राय दिला आहे. तसेच करारनामा संपुष्टात आलेले हे गाळे मनपाने ताब्यात घेऊन त्याचा पुन्हा लिलाव करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.