विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या झालेल्या निर्घृण खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी कुंभारी गावच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. मूख्य सूत्रधाराचे नाव निष्पन्न होऊनदेखील त्यास अटक केली जात नसल्याने त्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असताना या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा हिरिरीने प्रचार करणारे गुरुनाथ कटारे यांचा १३ ऑक्टोबर २०१४ रोजी कुंभारी येथे स्वत:च्या गावी कटारे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला होता. या घटनेमुळे खळबळ उडून अक्कलकोटच्या खूनखराब्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा प्रकाश पडला होता. या खून प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर होते. परंतु अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चार जणांना अटक केली. या सर्वानी सुपारी घेऊन कटारे यांचा खून केल्याची कबुली दिली होती. खुनाची सुपारी ज्यांनी दिली, त्याचे नाव समोर येताच सर्वानाच धक्का बसला होता. कारण मृत कटारे हे विधानसभा निवडणुकीत ज्यांचा हिरिरीने प्रचार करीत होते, ते भाजपचे उमेदवार तथा तत्कालीन आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांनी स्वत: कटारे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले होते. मागील २००९ सालच्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांचे समर्थक भीमराव कोरे यांचा शेगाव येथे पाटील यांच्या प्रचार सभेच्या वेळी खून करण्यात आला होता. या प्रकरणी पाटील यांचे प्रतिस्पर्धी तथा काँग्रेसचे तत्कालीन गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांच्या बंधूसह २९ जणांवर खटला दाखल झाला होता. हे प्रकरण म्हेत्रे यांच्या अडचणीचे ठरले, तर मतदारांनी सहानुभूती दर्शवत सिद्रामप्पा पाटील यांना निवडून दिले होते. अशाच स्वरूपाची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा सिद्रामप्पा पाटील यांना राजकीय लाभ घेता येऊ शकतो व ते पुन्हा निवडून येऊ शकतात, या हेतूने की काय, त्यांचे पुत्र रमेश पाटील यांनी गुरुनाथ कटारे यांच्या खुनाची सुपारी दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात आली आहे. त्यानुसार या प्रकरणात रमेश पाटील यांना आरोपी करण्यात आले आहे.
तथापि, या प्रकरणात पोलिसांनी राजकीय दबावापोटी तपास करून आपल्या मुलाला खोटेपणाने गुंतवल्याचा आरोप करीत या खून प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी सिद्रामप्पा पाटील यांनी केली होती. त्यानुसार त्यांच्याच भाजपच्या सरकारने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवली होती. परंतु मृत कटारे यांच्या कुटुंबीयांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थानिक पोलिसांकडेच तपास कायम ठेवावा, अशी मागणी केली असता उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तपासाचे काम सोलापूर ग्रामीण पोलिसांकडेच ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार या प्रकरणाचा तपास अक्कलकोट येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णकांत उपाध्याय हे करीत आहेत.
तथापि, या खून प्रकरणातील काही आरोपींनी पोलीस तपास यंत्रणेच्या विरोधात न्यायालयात तक्रार करीत नव्याने जबाब घेण्याची मागणी केली आहे. तर मुख्य सूत्रधार रमेश पाटील यांचाही शोध लागला नाही. त्यामुळे या खून प्रकरणाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच कुंभारीच्या गावकऱ्यांनी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
Devendra Fadnavis
बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव