पावसाने दडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र भयानक परिस्थीती निर्माण झाली असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीत केली.
तहसीलदार जयसिंग भैसडे यांच्या उपस्थितीत शनिवारी तालुका टंचाई आढावा बैठक झाली. पंचायत समितीच्या सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, जिल्हा परिषदेचे माजी राजेंद्र गुंड, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जेष्ठ नेते कैलास शेवाळे, शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रिक यांच्यासह गटविकास अधिकारी श्रीमती सांवत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आदी अधिकारी उपस्थित होते. कुकडीच्या अधिकाऱ्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.
या बैठकीत महावितरण कंपनीचे कर्जत तालुक्याचे अभियंता सिध्दीकी यांना विविध कारणांनी या बैठकीत धारेवर धरण्यात आले. आमदार राम शिंदे यांनीदेखील महावितरणच्या कारभाराबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच पिक विमा योजनेत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.