01 October 2020

News Flash

‘परिवार विकत घ्या, मात्र शेती वाचवा’

वाशीम जिल्हय़ातील शेतकरी पुत्राची सरकारकडे उद्विग्न मागणी

शेतात लावलेल्या फलकासह संपूर्ण शेतकरी कुटुंब.

 

‘माझा परिवार विकत घ्या, मात्र माझी शेती वाचवा’, अशी उद्विग्न मागणी वाशीम जिल्हय़ाच्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी पुत्र विजय शेडगे यांनी सरकारकडे केली आहे. विजय शेडगे यांनी आपल्या शेतात चक्क फलक लावून कुटुंब विक्रीला काढले आहे.

मालेगाव तालुक्यात कोळगाव येथे शेतकरी पुत्र विजय शेंडगे हे आपल्या कुटुंबासह राहतात. यांच्या आजोबांच्या नावावर सात एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर चार लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. आता अवकाळी पावसाने हातचे पीक गेले. या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नाही. अनुदान तेही अल्प असून, शेती सुद्धा दम तोडायला लागली आहे. ‘जीव घ्या, पण माझी शेती जगवा. नाही तर इच्छा मरणाची परवानगी द्या’, अशी मागणी विजय शेडगे यांनी शेतात लावलेल्या फलकावर केली आहे.

अधिवेशनात नवीन सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील, अशी आशा होती. नवीन सरकारने दोन लाखांची कर्जमाफी केली, त्याचे स्वागत आहे. मात्र, इतर प्रश्न व समस्या कायम आहेत. उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे हेक्टरी २५ हजार देणार म्हणून सांगितले होते. ते जाहीर केले नाही. पीक विमा काढूनही त्याची मदत मिळाली नाही.

सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विमा कंपनीचे कार्यालय मुंबईत आहेत, असा दम दिला होता. सत्तेत आल्यानंतर ते विम्याची नुकसान भरपाई मिळण्याच्या मुद्यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे शेंडगे म्हणाले.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही घोषणा अपुरी आहे. त्याचे निकष स्पष्ट झाले नाहीत. नुकसानच्या मदतीची घोषणा केली नाही. विमा कंपन्यांकडून नुकसानीची भरपाई करण्यात आली नाही. त्यामुळे संकटात असल्याने उद्विग्न होऊन कुटुंब विक्रीस काढले. याची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करणार आहे.

– विजय शेंडगे, शेतकरी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 1:25 am

Web Title: demand for farmers son in government in washim district abn 97
Next Stories
1 महाराष्ट्रातील पहिले वृक्षसंमेलन बीडला
2 महिला पोलिसावर हल्ला करून कैद्याचा पलायनाचा प्रयत्न
3 दहावीच्या गणितात यंदा पैकीच्या पैकी कठीण!
Just Now!
X