सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणपतीची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी येथील मुर्तीकारांनी केली आहे.

श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत यांच्यासह उदय अळवणी, विलास मांजरेकर, प्रकाश सावंत, गंगाराम उर्फ काका सावंत, गुरुदास गवंडे, नाना परब, अक्षय जाधव इत्यादींनी या संदर्भात सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तींना गोवा राज्यातही मागणी असते. दरवर्षी हजारोच्या संख्येने या मूर्त्यां  तिकडे जातात. तसेच गोवा राज्यात बनवलेल्या काही मूर्त्यां  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणल्या जातात. गेल्या काही वर्षांत मातीच्या पर्यावरण पूरक मूर्तींमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मातीचे वाढते दर, मजुरी यामुळे मूर्तिकार आर्थिक कचाटय़ात सापडले आहेत.  गोव्यामध्ये मूर्तीच्या दर एक किंवा दोन फुटामागे अनुदान देण्यात येते. त्या धर्तीवर निदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी आहे.

याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांनी वेळोवेळी बैठका घेऊन स्थानिक आमदार खासदारांकडे मागणी केली. मात्र मूर्तिकारांना फक्त आश्वासने देण्यात आली, अशी तक्रार मूर्तीकारांची आहे. मुंबईतील व मुंबई जवळील कोकण परिसरातील जिल्ह्यामध्ये मूर्तिकारांच्या बैठका पर्यावरण मंत्री  यांनी घेतल्या, त्यांच्या हितांचे निर्णय झाले ,मग तळकोकणातील मूर्तीकारांसाठी वेगळा न्याय? दुजा भाव का?असा प्रश्न काही मूर्तीकारांनी उपस्थित केला आहे. विशेषत:, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मूर्तिकार आर्थिकदृष्टय़ा आणखीच भरडला गेला आहे. मात्र तरीही शासनाने मूर्तिकारांच्या समस्येकडे पाठ फिरवली असल्याबद्दल खंत व्यक्त करून हे मूर्तीकार म्हणाले की, ‘चांदा ते बांदा’ योजना सुरू असताना मूर्तिकारांसाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत तसेच यंत्र सामग्री व साहित्य देण्याविषयी विचार विनिमय सुरू होता. मात्र ही योजनाच सरकारने गुंडाळल्यामुळे जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी कोणतेच आर्थिक सहाय्य नाही; अशा परिस्थितीत बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तरी वाढवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.