कोकणातील आंबा हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र टाळेबंदीमुळे बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे, निर्यात बंद असल्याने आंबा बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊ न आंब्याला शासनाने हमीभाव योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे.

कोकणातील हापूस आंबा आता बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यतून आंबा मुंबईत दाखल होत आहे. मात्र टाळेबंदीमुळे आंब्याला पाहिजे तसा उठाव मिळत नाही. तसेच निर्यात बंद असल्याने आंबा दर पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंब्याला शासनाने हमी भाव द्यावा. अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुध खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्यसरकारने आंबा उत्पादकांचा माल योग्य दरात खरेदी करावा. आणि तो नंतर प्रक्रीया उद्योगांना विकावा. अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आंबा बागायतदारांना दिलासा देण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बागायतदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने पाऊले उचलावीत. अशी मागणी त्यांनी राज्यसरकारकडे केली आहे.