प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी उसाच्या हमीभावात प्रति टन १०० रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. गतवर्षी उसाच्या हमीभावात वाढ करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आताची वाढ ही स्वागतार्ह आहे, मात्र साखर कारखान्याचे आíथक गणित न बिघडण्यासाठी साखरेच्या हमीभावातही वाढ केली पाहिजे, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे.

नॅचरल शुगर उद्योग समूहाचे प्रमुख व खासगी साखर कारखाना (विस्मा) संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले की, उसाच्या हमीभावात केलेली वाढ ही अतिशय योग्य आहे, कारण उसाला योग्य भाव मिळाला तरच शेतकरी ऊस पीकवतील व साखर कारखानेही चालतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेची आधारभूत किंमत ठरवण्याचा निर्णय घेतला. त्या आधीच्या सरकारांनी साखरेच्या भावाकडे दुर्लक्ष केले होते. उसाचा भाव वाढला तर त्या प्रमाणात साखरेचे भाव वाढतील अशी अपेक्षा होती. देशात साखरेच्या उत्पादनाचा खर्च विविध राज्यांत तीन हजार ४५० ते तीन हजार ६५० या दरम्यान येतो. महाराष्ट्राचा सरासरी खर्च हा तीन हजार ५०० रुपये आहे. साखरेचा भाव हा तीन हजार १०० रुपये आहे, त्यामुळे ४०० रुपये प्रति क्विंटल साखर कारखाने तोटय़ात चालतात.

उपपदार्थ बगॅस व मोलॅसिस यांची किंमत धरली तर बगॅसचे १०० रुपये आणि मोलॅसिसचे १५० असे २५० रुपये साखर कारखान्यांना मिळतात, तरीही टनामागे १५० रुपये तोटा साखर कारखान्यांना सहन करावा लागतो. उसाचा भाव टनाला १०० रुपये वाढवला, तर त्या मानाने साखरेचा भाव क्विंटलला किमान २०० रुपये वाढवणे अपेक्षित होते. केंद्र शासनाने या पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. सुरुवातीला उसाचा भाव वाढवला. आता साखरेचा भाव कधी वाढतो याकडे कारखान्यांचे डोळे लागले असल्याचे ते म्हणाले.

मांजरा साखर कारखाना परिवाराचे प्रमुख माजी मंत्री व मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी, केंद्र सरकारने उसाचा वाढवलेला खरेदी दराचा निर्णय हा अतिशय योग्य असून आपण या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. तथापि, साखर उद्योग टिकवायचा असेल तर साखरेलाही वाढीव हमीभाव मिळाला पाहिजे अन्यथा साखर कारखाने बंद पडतील. ऊस, साखर, इथेनॉल यांचे दर व्यावहारिकदृष्टीने निश्चित केल्यास सर्वाना फायदा होईल. धोरण हे र्सवकष असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विकास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, लातूर जिल्हय़ाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी उसाच्या हमीभावात केलेल्या वाढीचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. साखरेचे भाव, इथेनॉलसंबंधीचे धोरण आणि सहवीजनिर्मितीचे दिले जाणारे भाव यात सरकारने योग्य भूमिका घेतली तर साखर कारखानेही अडचणीतून बाहेर येतील. केंद्र सरकार याबाबतीत योग्य भूमिका घेईल अशी आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.