सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ असल्याने जिल्ह्य़ात प्रत्येक महसूल मंडळ कार्यालयात पावसाची नोंद व्हावी म्हणून बागायतदार व शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच काही तालुक्याची मुख्यालये मध्यवर्ती नसल्याने वादळी वाऱ्यात नुकसानी झालेल्या गावांना शासनाच्या निकषाचा फटका बसत आहे.
 शनिवारी निरवडे, सोनुर्ली, तळवडे भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, त्यामुळे निरवडे येथे विद्युत पोल कोसळून प्रवाहीत वीज तारा एका म्हशीला स्पर्श झाल्या. त्यामुळे शेतकरी विनय नाईक यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. पण या वादळी वारा पावसाची नोंद सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नव्हती.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात १६ मि.मी. एवढी पावसाची नोंद होती, तर भरपाईसाठी ६५ मि.मी. एवढा पाऊस नोंदला जाणे आवश्यक आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालय मध्यवर्ती नाही. त्यामुळे ग्रामीण भागात, डोंगरदऱ्यात कोसळणारा पाऊस, पूरस्थितीची नोंद तहसीलदार कार्यालयात होणे शक्य नाही.
सावंतवाडी तालुका तहसीलदार कार्यालय कुडाळ तालुक्याच्या हद्दीला, दोडामार्ग तहसील कार्यालय गोवा राज्याच्या हद्दीला, वेंगुर्ले, मालवण व देवगड तहसीलदार कार्यालये सागरी किनाऱ्यानजीक आहेत. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पाऊस नोंदला गेला नसेल तर भरपाई शक्य नाही, असे शासनाचे नियम आहेत.
वादळी वारा, मुसळदार पाऊस, वीज कोसळणे यांसारख्या प्रकाराने वित्त व जीवितहानी होते. हे संकट सांगून येत नाही, त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील आपत्तीकालीन कक्षात नोंद नसेल तर भरपाई नाही आणि संकट आलेच नाही, असे उत्तर शासकीय कार्यालयातून मिळते.
सिंधुदुर्ग जिल्हा ई-ऑफिस, ई-मोबाइलप्रणालीने जोडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ाची भौगोलिक स्थिती पाहून प्रत्येक महसूल मंडळ कार्यालयात पर्जन्यमापके बसविणे गरजेचे आहे. तसेच जलसंपदा विभागातील पाटबंधारे प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्प, तलाव आदी ठिकाणी पर्जन्यमापकातील पावसाची नोंद महसुलाने ग्राह्य़ मानावी अशी मागणी आहे.
महसूल मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी पर्जन्यमापके बसवून दैनंदिनी पावसाची नोंद केल्यास सिंधुदुर्गात कोसळणारा नेमका पाऊस कळेल. शिवाय वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नेमकी झालेली नुकसानी ग्राह्य़ धरता येईल असे बोलले जाते.