11 December 2017

News Flash

नॉयलॉन मांजावर बंदीची मागणी मान्य

मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर पतंग उडविण्याचे वेध बच्चे कंपनीसह थोरा-मोठय़ांनाही लागले असताना या उत्सवात वापरल्या

प्रतिनिधी, नाशिक | Updated: December 29, 2012 5:48 AM

मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर पतंग उडविण्याचे वेध बच्चे कंपनीसह थोरा-मोठय़ांनाही लागले असताना या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना प्राण गमवावे लागत असल्याने जिल्ह्यात प्रथमच नायलॉन धाग्याच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धाग्याच्या वापरावर बंदी टाकण्यात आल्यामुळे काही अंशी का होईना पक्ष्यांना हवेत मुक्तपणे विहरताना या काळात घडणाऱ्या दुदैवी प्रकारांना चाप लागणार असल्याची पक्षीप्रेमींची प्रतिक्रिया आहे.
पतंग उडविताना वेगवेगळ्या प्रकारचा मांजा वापरला जातो. त्यात दोन ते तीन वर्षांपूर्वी नायलॉनच्या धाग्याचा समावेश झाला. पतंगोत्सवात काटाकाटी दरम्यान अनेकदा धागा इमारती व झाडांवर अडकतो. इतर मांजाचे कालांतराने विघटन होण्याची शाश्वती असली तरी नायलॉनच्या धाग्याचे विघटन होत नाही. परिणामी, कित्येक महिने तो आहे त्या अवस्थेत पडून रहातो. हवेत विहरणाऱ्या पक्ष्यांसाठी हा धागा सर्वाधिक धोकादायक ठरल्याचे पक्षीप्रेमींच्या निदर्शनास आले. कारण, मकरसंक्रांतीच्या काळात या धाग्यात अडकून अनेक पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या. त्यात काही पक्ष्यांना प्राण गमवावे लागले. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने नेचर क्लब ऑफ नाशिक व इतर काही संघटनांनी नायलॉन धाग्यावर बंदी आणण्याची वारंवार मागणी केली होती. सलग दोन ते तीन वर्षांपासून रेंगाळलेल्या या विषया संदर्भात निर्णय घेतला जात नव्हता. नॉयलॉनचा धागा कुजत नाही. वर्षभर तो तसाच झाडांवर अडकून पडतो. पक्ष्यांचे जीवनचक्र या मांज्यामुळे अडचणीत सापडले. अनेक दुर्मिळ पक्ष्यांना प्राण गमवावे लागले. पतंगोत्सवाचा आनंद एक दिवस घेतला जात असला तरी वर्षभर त्या धाग्याचा जाच पक्ष्यांना नाहक सहन करावा लागतो, असे नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी सांगितले.
 नाशिकमध्ये या प्रकारे २५० घुबड जखमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. पक्षीप्रेमी संघटनांनी वारंवार केलेल्या मागणीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. या एकूणच पाश्र्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी आर. के. गावडे यांनी १ जानेवारी ते २० जानेवारी २०१३ या कालावधीत नायलॉन दोरा निर्मिती, विक्री व वापर यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
 या धाग्याचा वापर अथवा विक्री करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे पतंगप्रेमींना आपल्या नेहमीच्या पारंपरिक धाग्याचा वापर करून पतंगोत्सव साजरा करावा लागणार आहे. 

First Published on December 29, 2012 5:48 am

Web Title: demand for nylon thread ban accepted
टॅग Ban,Kiting,Nylon Thread