व्यापारी गाळे असलेल्या व निवासी परिसरातील इमारतीत सुरू करण्यात आलेले कोविड उपचार केंद्र शहराबाहेर हलवावे, अशी मागणी नवी पेठ, नागेश्वर गल्ली, नागेश्वर वसाहतीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात जागा अपुरी असल्याचे कारण देत नवी पेठेतील पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात असलेल्या समर्पित कोविड उपचार केंद्राचे (डीसीएचसी) हे विस्तारित कोविड उपचार केंद्र आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोविड उपचार केंद्रातील रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, शुश्रूषा करणारे कर्मचारी, मदतनीस कोणत्याही करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करीत नाहीत. उपचार केंद्रात रुग्णांच्या नातेवाइकांची दिवस रात्र वर्दळ सुरू असते. अनेकदा रुग्णही परिसरात फिरताना आढळतात. त्यामुळे या उपचार केंद्राच्या परिसरात संसर्गाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

उपचार केंद्रातील रुग्ण खिडकीतून बाहेर थुंकतात, गुळण्या करतात, वापरलेल्या मुखपट्ट्या रस्त्यावर फेकतात, जेवणाचे डबे, ताटे धुवून खरकटे पाणी खिडकीवाटे बाहेर फेकतात. दारूच्या मोकळ्या बाटल्या परिसरात आढळतात. उपचार केंद्रातील स्वच्छतागृहाची, शौचालयाची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता झालेली नसावी त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे. या सर्व बाबींचा त्रास होत आहे. परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दहशतीखाली वावरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोविड उपचार केंद्रामुळे परिसरात निर्माण झालेल्या दहशती संदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांना १५ व २२ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. श्रीमती देवरे यांनी उपचार केंद्र इतरत्र हलवण्याचे आश्वासन दिले. मात्र कारवाई झाली नाही अथवा प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची काळजी घेण्यात येत नाही. कोविड उपचार केंद्राचे संचालक उडवाउडवीची उत्तरे देतात. वारंवार तक्रारी केल्यानंतर बंदोबस्तासाठी पोलीस मित्र तैनात करण्यात आले. मात्र रुग्ण, त्यांचे नातेवाईक पोलीस मित्र, गृहरक्षक दलाच्या जवानांना दाद देत नाहीत. रुग्णांचा त्यांच्या नातेवाइकांचा परिसरातील वावर थांबलेला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नगरसेविका शशिकला शेरकर, डॉ. नरेंद्र मुळे, कल्याण थोरात, योगेश वाघ, आकाश राऊळ, संदीप पुराणिक, बापूसाहेब हांडे, पत्रकार उदय शेरकर, सागर बोरूडे आदींसह  दीडशे नागरिक, व्यावसायिकांच्या सह्या आहेत.

परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना उपचार केंद्रात जाऊ  दिले जाणार नाही. घरच्या जेवणाचे डबे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपचार केंद्रातील रुग्ण बाहेर येणार नाहीत व त्यांचे नातेवाईक उपचार  केंद्रात जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

– ज्योती देवरे, तहसीलदार,पारनेर