मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. ब्राह्मण समाजाला जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गुजरातनंतर आता महाराष्ट्रातूनही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण आरक्षणाचा अहवाल मागासवर्ग आयोगाकडे पाठवणार असल्याचे सांगलीत बोलताना सांगितले.

ग्रामीण भागात राहणारा ब्राह्मण समाज हा आर्थिकृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा. त्यासाठी या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे, यामध्ये ब्राह्मण समाजाचे मागासपण सिद्ध झाल्यास त्यांनाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दवे यांनी केली आहे.

दरम्यान, जो समाज आरक्षणाची मागणी करेल त्यांचा अहवाल आम्ही मागासवर्ग आयोगाकडे पाठवतो. त्यानुसार, ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा अहवालही आम्ही आयोगाकडे पाठवू असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल पाटील यांनी सांगलीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ते बोलत होते.

गुजरातमध्ये ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. येथे या समाजाची लोकसंख्या ९ टक्के इतकी आहे. त्यामुळे इथल्या ब्राह्मणांनी आपला ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी इतर मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतली आहे.