खालापूर गावातून द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या जोड रस्त्यालगत अनधिकृत बांधकामांना ऊत आला असून, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण करून पक्क्या स्वरूपाचे गाळे बांधण्यात आले आहेत. खालापूर गावात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागू नये यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात आला असून, या भुयारी मार्गालगत पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. येथे परप्रांतीय व्यावसायिकांनी हातगाडय़ा लावल्यामुळे भविष्यात हा भुयारी मार्ग बंद होणार असल्याने शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गरसोय होणार आहे. हे गाळे बांधताना ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले असून हे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचा अधिकार आयआरबी कंपनीकडे आहे.
आयआरबीच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणली असता प्रथम तक्रारअर्ज द्या मग कारवाई करूअसे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून परवानगी दिल्याचे सांगण्यात आले, परंतु हे गाळे भाडय़ाने देण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गाळेधारकांवर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत.