|| मिल्टन सौदिया

चीनसह युरोपीय देशांतील मागणीत घट

वसई : वर्षभर संकटांशी सामना करणाऱ्या मत्स्य व्यवसायाला ‘करोना विषाणू’ प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. करोनाच्या भीतीने परदेशात होणारी मासळीची निर्यात थांबली आहे. भारतातून चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर मासळीची निर्यात होते. मात्र, चीनमधील मासळीची मागणी थांबली आहे. त्यामुळे पापलेट, कोळंबी, बांगडा, सुरमई, बळा, माकूळ अशी मिळून ५० कोटी रुपयांची मासळी निर्यातीविना पडून आहे.

जपान, अमेरिका, इटली यासह अन्य युरोपीय देशांमध्ये होणारी मत्स्यनिर्यातीला करोना विषाणूचा फटका बसला आहे. भारतातील मत्स्य निर्यातदार कंपन्या गोठवलेल्या माशांची निर्यात (फ्रोजन फिश) करतात. सध्या प्रक्रिया केंद्रामध्ये माशांनी भरलेले कंटेनर विविध बंदरांमध्ये अडकून पडले आहेत.

‘करोना’चा प्रभाव ओसरण्यास काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मासळी निर्यातीला बसण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. ‘वसई सी फूड’  या मत्स्य निर्यातदार कंपनीच्या केंद्रात गोठविण्यात आलेली  ५० कोटींची मासळी निर्यातीविना पडून असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक डॅनियल रुमाव यांनी दिली.

अर्नाळ्यातील दि अर्नाळा फिशरमेन्स संस्था मच्छिमारांकडून मासळी खरेदी करून त्याची निर्यातदारांना विक्री करते. मात्र, करोनामुळे निर्यातदारही मासळी उचलण्यास पुढे येत नाहीत, अशी माहिती संस्थेचे सचिव मोरेश्वर वैती यांनी दिली. काही निर्यातदारांनी मासळीच्या किमतीत कपात केल्याने त्याचा फटका सामान्य मच्छीमारांना बसला असल्याची माहिती वैती यांनी लोकसत्ता बोलताना सांगितले.

किरकोळ विक्रेत्यांनाही फटका

किरकोळ बाजारातील मासळीविक्रेत्या महिलांनाही याचा फटका बसला आहे. खवय्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. निर्यातदारांकडून मासळीखरेदीसाठी होत असलेली टाळाटाळ यामुळे खोल समुद्रातून मासळी किनाऱ्यावर आणली तरी खरेदीदार नसल्याने या मासळीचे करायचे तरी काय, असा प्रश्न सामान्य मच्छीमारांपुढे निर्माण झाला आहे.