पालिका निवडणुकीत मतदारांच्या गोंधळाची चिन्हे

पालिका निवडणुकीत मतदानासाठी नगराध्यक्षपदाकरिता स्वतंत्र मतदान यंत्र नसल्याने मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी स्वतंत्र मतदान यंत्रांची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे अभिप्राय मागविला आहे.

[jwplayer xpbAHLf3]

नगराध्यक्षपदाची निवडणूक ही लोकांमधून होत आहे. त्याचबरोबर एका प्रभागात दोन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. मतदान यंत्रावर सर्वात आधी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची नावे असतील. त्यानंतर प्रभागातील अ व ब विभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे असतील. यंत्रावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावाचा रंग हा गुलाबी तर नगरसेवक पदाच्या अ विभागातील उमेदवारांच्या नावाचा रंग पांढरा व ब विभागातील उमेदवारांच्या नावाचा रंग फिकट निळा असेल. यंत्रावर प्रथम नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची नावे, त्यानंतर नाटो अशी बटणांची रचना असेल. त्याखाली नगरसेवक पदांचा अ विभागातील उमेदवार, पुन्हा नाटो नंतर ब विभागातील उमेदवार व नंतर नोटा म्हणजे कुणीही नाही याचे बटन असेल. यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. जिल्हय़ात आठ पालिकांच्या निवडणुकांसाठी दि. २७ रोजी मतदान होत आहे. प्रभाग लहान झाल्याने निवडणुकीत या वेळी अपक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बहुतेक प्रभागात दोन ते तीन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. मात्र नगराध्यक्षपदाला मतदान केल्यानंतरच यंत्रावर अ व ब प्रभागातील उमेदवारांना मतदान करता येईल. अन्यथा ते यंत्रावर नोंदविले जाणार नाही. यात मतदारांना अडचणी येतील.

नगराध्यक्षपदाकरिता स्वतंत्र मतदान यंत्राची मागणी झाल्यास त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून सूचना मागविण्यात येतील. त्यांचे निर्देश आल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. सुमंत मोरे, साहाय्यक निवडणूक अधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका

[jwplayer tK6Zk4JO]