सांगली मतदारसंघातून काँग्रेसचा सातत्याने होत असणारा पराभव टाळण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मदन पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले असताना पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारीची मागणी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आणखी एका गटाची भर मानली जात आहे.
    सांगली विधानसभा मतदारसंघातून नवा चेहरा म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे म्हणून त्यांचा उमेदवारीवर दावा असला तरी पक्षाने संधी दिली नाही तर निष्ठावान म्हणून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.
    सांगलीत काँग्रेसचा पराभव केवळ काँग्रेसच करू शकते यामागे पक्षात असणारी गटबाजी कारणीभूत असल्याने सहकारी संस्था डबघाईला आणणाऱ्या लोकांना जनता स्वीकारत नाही, त्यामुळे नवा चेहरा देण्यासाठी माझी उमेदवारी समर्थ पर्याय असल्याचा दावा श्री. पाटील यांनी पत्रकार बठकीत रविवारी केला. सांगली जिल्ह्याचा कृषी औद्योगिक विकास वसंतराव दादा, राजारामबापू आणि गुलाबराव पाटील यांनी केला. काँग्रेस अडचणीत असताना गुलाबराव पाटील यांनी प्रेमलाकाकी चव्हाण यांच्याबरोबर इंदिरा गांधी यांना साथ दिली. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.