मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून ६८ लाख रुपयांचे परीक्षाशुल्क माफ करण्यात आले. मात्र, गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती तेवढीच हलाखीची आहे. सुट्टीत त्यांना मोफत वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा, शिका योजना राबवावी. परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, या मागण्यांसाठी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कुलगुरूंना निवेदन दिले. कार्यवाही न केल्यास भारतीय विद्यार्थी सेना आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा संघटक तुकाराम सराफ यांनी दिला.
गारपिटीनंतर मराठवाडय़ातील अनेक विद्यार्थी हलाखीचे जीवन जगत आहेत. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची नितांत आवश्यकता आहे. परीक्षेनंतरही त्यांना वसतिगृहात राहू द्यावे तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करावे, यासाठी विद्यापीठाने सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले उपस्थित होते. गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही करण्यात आली होती. मात्र, या संदर्भातील निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने तसे प्रस्ताव पाठविले जातील, असे सदस्यांना सांगण्यात आले होते. मात्र या अनुषंगाने कार्यवाही झाली नव्हती. ती तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठात सुमारे १००पेक्षा अधिक विद्यार्थी गारपीटग्रस्त भागातील आहेत. त्यांच्या पालकांचे अर्थकारण बिघडलेले असल्याने सध्या काही मुलांना भोजनाचीही भ्रांत आहे.