सार्वजनिक वितरणातील केशरी कार्डधारकांना (एपीएल) सवलतीच्या दरात धान्य योजना सुरू करावी व रॉकेलचा कोटाही पूर्ववत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनास या वेळी निवेदनही सादर करण्यात आले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार तथा नगरचे महापौर संग्राम जगताप, किसनराव लोटके, नगरसेवक समद खान, अभिषेक कळमकर, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत, शारदा लगड, राजश्री मांढरे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना या वेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात यापूर्वी केशरी कार्डधारकांसाठीही सवलतीच्या दरात धान्य योजना राबवण्यात येत होती. या लोकांना महिन्याकाठी १० किलो गहू व ५ किलो तांदूळ असे पंधरा किलो धान्य मिळत होते. काँग्रेस आघाडीचे सरकार त्यासाठी दर महिन्याला १२० कोटी रुपये खर्च करत होते. ही सवलत बंद करतानाच आता रॉकेलच्या कोटय़ातही कपात करण्यात आली आहे.
या दोन्ही निर्णयांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये राज्य सरकारबद्दल कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याची तीव्रता आधिक आहे. सवलतीच्या दरातील धान्य आणि रॉकेलचा कोटाही कमी झाल्याने अनेकांच्या घरात चुलीचाच प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात आजही अनेकांची चूल रॉकेलवरच चालते. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. काँग्रेस आघाडीच्या राज्य सरकारने या लोकांचे हित डोळय़ांसमोर ठेवूनच ही योजना सुरू ठेवली होती. या राज्य सरकारने मात्र त्यावर वरवंटा फिरवला आहे. सर्वसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या दोन्ही योजना पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.