सोलापुरातील मूर्तिकारांनी आपल्या मूर्तिकलेचा सुंदर आविष्कार घडवित साकारलेल्या एकापेक्षा एक गणरायाच्या मूर्तीना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी प्रांतातून मागणी असते. गणेशोत्सवास काही अवधी राहिला असताना या गणरायाच्या मूर्ती मागणीप्रमाणे विविध प्रांतांमध्ये प्रस्थान ठेवण्यास सज्ज झाल्या आहेत.
गणेशमूर्ती घडविणाऱ-या मूर्तिकारांची सोलापुरातील परंपरा चार-पाच पिढ्यांपासूनची जुनी आहे. शहराच्या पूर्व भागात ही मूर्तिकला विशेषत्वाने जपली गेली आहे. शहरात गणेशमूर्तीचे सुमारे पन्नासपेक्षा जास्त कारखाने आहेत. या कारखान्यांतून शेकडो मूर्तिकार गणेशोत्सवाच्या अगोदर सहा महिन्यांपासून गणरायांच्या मूर्ती घडविण्यात दंग झालेले असतात. त्यापकी अनिल मंजुळे, दीपक वईटला, अमरनाथ कणकी हे मूíतकार आपल्या कलेचा वारसा मागील चार-पाच पिढ्यांपासून चालवित आले आहेत. कन्ना चौक, राजेंद्र चौक, भुलाभाई चौक, अशोक चौक आदी भागात फेरफटका मारला असता तेथील अनेक कारखान्यांमध्ये मूíतकार मंडळी रात्रंदिवस गणरायाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात गर्क झालेली दिसून येतात. बहुसंख्य कारखान्यांमध्ये विविध रूपातील गणरायाच्या मूर्ती तयार होऊन मागणीनुसार बाहेर पडण्यासाठी तयार झाल्या आहेत.
गणरायाच्या पारंपरिक वेशातील मूर्तीपेक्षा समाजावर प्रभाव टाकणाऱ्या पौराणिक ऐतिहासिक वीर पुरूषांपासून ते क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर,महेंद्र धोनीपर्यंत व्यक्तींचा प्रभाव गणरायांच्या मूर्ती घडविण्यावर पडतो. यंदा सध्या छोट्या पडाद्यावर गाजत असलेल्या जय मल्हार मालिकेतील खंडेरायांची छाप गणरायांच्या मूर्तिकलेवर विशेषत्वाने पडली आहे. नुकताच गाजलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटातील अभिनेत्याचेही दर्शन घडले आहे. खांद्यावर महादेवाची िपड वाहून निघालेल्या अभिनेत्याच्या रूपातील गणरायाला अधिक मागणी आहे.
पाच फुटापासून तेरा फूट उंचीच्या मूर्ती हैद्राबाद, सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरू आदी महानगरांकडे प्रस्थान ठेवण्यासाठी तयार झाल्या आहेत. दीपक वईटला हे आपले आजोबा रामय्या वईटला आणि वडील अंबाजी वईटला यांचा वारसा चालविताना त्यांनी यंदा साकारलेली समुद्रघोड्यावरील शंकराच्या रूपातील गणरायाची दहा फुटी मूर्ती अतिशय सुबक आणि कलाविष्काराचा उत्कट नमुना आहे. समुद्रघोडा हा दीपक वईटला यांच्या कल्पनेतूनच साकारला गेला आहे. ही मूर्ती हैद्राबाद येथे जाणार आहे. मूíतकलेत दीपक यांना त्यांचे चिरंजीव आकाश (१८) हे मदत करतात.
अनिल मंजुळे हे आपले आजोबा भीमराव मंजुळे यांच्यापासून गणरायाच्या मूíतकलेचा वारसा चालवत आहेत.त्यांनी ४० मूर्ती तयार केल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण भारत स्वच्छता अभियानाचा संदेश देणारी मूर्ती गणपतीच्या मूर्तीसह हैद्राबादला जाण्यास सज्ज होत आहे.