इंडियन नॅशनल थिएटर (आय.एन.टी.)चे लोककला उपकेंद्र म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालयास मान्यता देण्याची तयारी उपसंचालक रामचंद्र वरक यांनी दर्शविली असून महाविद्यालय संस्थाचालकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत विचार होईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात इंडियन नॅशनल थिएटर (आय.एन.टी.) चे उपसंचालक रामचंद्र वरक आले असताना त्यांनी स्थानिक लोककलांना संजीवनी देण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे सांगत आपण सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगावचा सुपुत्र आहे, असे स्पष्ट केले. या महाविद्यालय संस्थेचे सचिव प्रा. एम. डी. देसाई व उपाध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्याशी चर्चा करून लोककला उपकेंद्राचा प्रस्ताव ठेवला. रामचंद्र बरक म्हणाले, सध्या जिल्ह्य़ात दशावतार लोककला टिकून आहे. हा ठेवा टिकविणाऱ्या कलाकारांना कलेतून उत्पन्नही मिळत आहे.
सिंधुदुर्गात समई नृत्य, चपई नृत्य, गोप नृत्य अशा विविध लोककला आहेत. त्या फक्त सण किंवा कार्यक्रमप्रसंगी सादर केल्या जातात. या आणि अन्य लोककलांना संजीवनी मिळाल्यास त्यांच्या सादरीकरणातून कलाकारांना उत्पन्न मिळू शकते, असे रामचंद्र वरक म्हणाले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थी एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण देता येईल. त्यासाठी लागणारे प्रशिक्षक इंडियन नॅशनल थिएटर संस्था पुरवील. तसेच प्रशिक्षणार्थीना कला सादर करण्यासाठी विविध पर्याय शोधले जातील. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित झाल्याने स्थानिक लोककला पर्यटकांसमोर सादर करण्यास संधी मिळेल, असा विश्वास रामचंद्र वरक यांनी व्यक्त केला.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपैकी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन कलाकार बनविण्याचा प्रयत्न करू, असे रामचंद्र वरक म्हणाले.
या वेळी संस्था सचिव प्रा. एम. डी. देसाई म्हणाले, आम्ही याविषयी चर्चा करून निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांसाठी पोषक व सकारात्मकता यामध्ये दिसून येत असल्याने सकारात्मक निर्णय होईल.