शैक्षणिक संस्था चालकाच्या पाच वर्षीय मुलाचे त्यांच्याच घरात राहून गेलेल्या भाडेकरूच्या भावाने अपहरण करून २० लाखांची मागणी केली. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळून अडीच ते तीन तासातच मुलाला त्याच्या आई- वडिलांकडे पोहचवत आरोपीला बेड्या ठोकल्या. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. संतोष रमेश सनान्से (वय २९, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

वडगाव कोल्हाटी येथील पौर्णिमा सोमशेखर हिरेमठ (४२, गट क्र. ११, प्लॉट क्र. ६) या अंबेलोहळ येथील स्व. मधुकरराव देशपांडे शिक्षण संस्था चालवतात. सोमवारी सकाळी सात वाजता त्या शाळेवर गेल्या होत्या. त्या शाळेत असताना ऑफीस बॉय अमोल जाधव याच्या मोबाइलवर सोमशेखर हिरेमठ यांनी संपर्क साधत, मुलगा शौर्य हा घरात दिसत नसल्याचे सांगितले. तेव्हा पौर्णिमा हिरेमठ यांनी तो गच्चीवर नाही तर खाली खेळत असेल असे म्हणत फोन ठेवला. मात्र, तोपर्यंत पौर्णिमा यांच्या मोबाइलवर अपहरणकर्ता संतोष सनान्से याचे चार मिसकॉल होते. त्यामुळे पौर्णिमा यांनी सनान्सेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने मुलगा शौर्य याचे आपण अपहरण केले असून, त्याची सुटका करण्यासाठी २० लाख रुपये द्या असे धमकावले. तसेच ही रक्कम घेऊन एमआयडीसी वाळुजमधील हायटेक कॉलेज जवळ या असेही सांगितेले. शौर्यचे अपहरण झाल्याचे कळताच भांबावून गेलेल्या पौर्णिमा यांनी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

यानंतर सनान्सेच्या मोबाइलचे लोकेशन घेण्यात आले. सनान्सेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खबरीशी संपर्क साधला. त्यालाच सनान्सेशी बोलण्यास सांगितले. खबरीने सनान्सेला ठरल्यानुसार रक्कम आणून देतो असे सांगितले. त्यावर सनान्सेने आधी माझी माणसं पैसे घेऊन जातील आणि मग प्रताप चौकात मुलगा दिला जाईल असे सांगितले. खबरीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर सोमशेखर व खबरी असे हायटेक कॉलेजजवळ थांबले. याचदरम्यान पोलिसांनी खबरीला सनान्सेशी बोलत राहा, म्हणजे त्याचे लोकेशन मिळेल असे सांगितले. त्यानुसार, खबरी त्याच्याशी सलग बोलत राहिला. लोकेशनवरुन सनान्सेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर प्रताप चौकातून मुलगा शौर्यला ताब्यात घेण्यात आले.

व्हाईस रेकॉर्डींगवरुन आवाज ओळखला –
सनान्से हा कर्जबाजारी झाला होता. त्याला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने संस्था चालकाच्या मुलाचेच अपहरण करण्याचे ठरवले होते. मात्र, वारंवार एकच मोबाइल क्रमांक आणि आवाजावरुन सनान्से अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याशिवाय पौर्णिमा यांनी सनान्सेने केलेला प्रत्येक कॉल रेकॉर्ड करुन ठेवला होता.

यापूर्वी एका मुलाचा मृत्यू –
हिरेमठ कुटुंबीयांच्या एका मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या निधनानंतर अनेक वर्षांनी शौर्य झाला. त्यामुळे शौर्यवर त्याच्या आई – वडिलांचा अत्यंत जीव आहे, हे आरोपीने नेहमीच्या जाण्या – येण्यातून ओळखले होते. भाऊ राहत असताना आरोपीचे जाणे – येणे व्हायचे. त्यातून शौर्यलाही आरोपीची तोंडओळख होती. त्यामुळेच तुला आईने बोलावले म्हणताच शौर्य संतोष सोबत गेला. पोलिसांनी अत्यंत संयमाने प्रकरण हाताळून मुलाला सुखरूप आई- वडिलांकडे सोपवले व आरोपीला फोनवर बोलण्यात गुंग ठेवून त्याचा माग काढत पकडल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.