रोजगारच नसल्याने उपासमारीची वेळ; लघुउद्योगही मंदावले ; रोजगार हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा

दर वर्षी शेतीची कामे संपली की वाडा तालुक्यात घरांच्या बांधकामांना, शाकारणींना सुरुवात व्हायची. या वेळी मात्र नोटाबंदीच्या तडाख्याने ही सर्व कामे तर थांबली आहेतच, पण लघुउद्योगांनाही फटका बसला आहे. त्यामुळे वीटभट्टीवर न जाता रोजगाराच्या अपेक्षेत घरीच थांबलेल्या आदिवासींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबरमध्ये कुपोषणामुळे जीव गेलेल्या रोशनी सवराचे कुटुंबीयही त्यापैकीच एक. आता रोजगार हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

वाडय़ापासून मोखाडय़ापर्यंत सध्या वैरणीचे गठ्ठे बांधून ठेवण्याचे काम सुरू आहे. उन्हात चमकणाऱ्या सोनपिवळ्या गवताचे भारे रचून ठेवले जात आहेत. या भाऱ्यासाठी दिवसाला ५०-६० रुपये मजुरी मिळते. मात्र इतर कामेच बंद असल्याने केवळ या रोजगारावर आदिवासी अवलंबून आहेत. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था लंगडी झाल्याचे अधिकृतरीत्या समोर येत आहेत. आदिवासींचा तसा नोटांशी फारसा संबंध नाही, बँका, एटीएम हे दूरच राहिले. त्यामुळे नोटाबंदी झाली तेव्हाही तालुक्याचे बाजार वगळता इतरत्र फारसा दृश्यपरिणाम जाणवत नव्हता. मात्र नोटाबंदी लांबली आणि गावातल्या घराच्या बांधकामांपासून लघुउद्योगापर्यंत सर्वच मंदावले.

दर वर्षी शेती संपली की रोजच्या कामाची खात्री संपते, मात्र तरीही गावात घरबांधणी सुरू होते, कोणाच्या घरी शाकारणी सुरू होते. आठवडय़ाला तीन-चार दिवस कामे मिळतात, पण या वेळी कामच नाहियेत, असे रोशनीचे वडील गुरुनाथ सवरा सांगत होते. त्यामुळे घरावर उपासमारीची वेळ आली आहे. गावातला मासेमारीची जाळी बनवण्याचा लघुउद्योगही बंद पडला आहे. त्यामुळे सवरा यांच्या घरात दोन महिन्यांपूर्वी जन्माला आलेला रोशन, त्याची तीन वर्षांची बहीण यांच्यासह मोठय़ांचेही खायचे हाल होत आहेत. सरकारकडून काम मिळणार, असे सांगितले जाते, मात्र अजूनही कामे सुरू झालेली नाहीत, असे गुरुनाथ सवरा म्हणाले. ग्रामसेवकांच्या संपामुळे सवरा यांच्या नवीन घराची मंजुरी अडली होती. आता घरासाठी मोजमाप सुरू आहे. अजूनही घराचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे किमान पावसाळ्याआधी घर व्हावे, याची प्रतीक्षा आहे. रोशनच्या प्रसूतीआधी सोनोग्राफीचे दिलेले पैसेही सवरा कुटुंबीयांना अजून मिळालेले नाहीत. मात्र अंगणवाडी सेविका सोनोग्राफीची पावती घेऊन गेली आहे. त्यामुळे आज ना उद्या पैसे मिळतील, अशी आशा रोशनीच्या आईला वाटते.

मोखाडय़ात चित्र तुलनेत बरे

वाडय़ापासून ५० ते ६० किलोमीटर दूर असलेल्या मोखाडा तालुक्यात मात्र या वेळी जरा बरी स्थिती आहे. या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून वनविभागाकडूनही चर खोदण्याचे, पाट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे मोखाडय़ातील अनेक आदिवासी वीटभट्टीवर किंवा दगडखाणीत जाण्याऐवजी घरीच राहिले आहेत. कळमवाडीत सहा महिन्यांपूर्वी कुपोषणाने मृत्यू झालेल्या सागर वाघचे वडील व त्यांच्या भावांचे कुटुंबीय कुडुस येथे दगडखाणीवर गेले होते. मात्र आता रानात काम सुरू झाल्याने परत आले, असे सागर वाघच्या आईने सांगितले. दर आठवडय़ाला पैसे घरात येतात. त्यामुळे रोजगाराची चिंता नाही, असेही त्या म्हणाल्या. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेटीदरम्यान मदतीचे दिलेले आश्वासन मात्र अजूनही पूर्ण झालेले नाही. कळमवाडीच्या शेजारीत खोचमध्ये असलेल्या ईश्वर सवरा यांच्या घरची मंडळीही मोखाडय़ातच राहिली आहेत. ईश्वरचा कुपोषणाने सप्टेंबरमध्ये मृत्यू झाला. चौथीत शिकणाऱ्या त्याच्या बहिणीला- सोनालीला शाळेतून काढून नाशिकमध्ये खडी फोडण्याच्या कामावर जाण्यासाठी ईश्वरच्या आईवडिलांनी तयारी केली होती. मात्र रस्त्यांची कामे सुरू झाल्यावर रोजगार मिळू लागला त्यामुळे सोनालीची शाळा सुटली नाही. अर्थात रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेले जॉब कार्डही सगळ्यांच्या नशिबी नाही. शेजारीच राहणाऱ्या हिरा भोये यांना अजूनही रोजगार हमी योजनेत सामावून घेतले नसल्याने डोळ्यांसमोर काम असूनही त्यांना ५०-६० रुपयांच्या रोजगारासाठी गावातल्या शेतावर कामासाठी भटकावे लागते. मात्र आता कार्ड देण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. मोखाडय़ातील रस्त्यांचे काम सध्या खोळंबले आहे. मात्र रस्त्याचे पुढचे पैसे कंत्राटदारांकडे जमा झाले की कामे सुरू होतील, असे अधूनमधून घडते, असे ग्रामस्थांनी सांगितले.